'डॉ नरेंद्र दाभोलकरांचा खून हा त्यांचे विचार संपविण्यासाठी केलेला एक सुनियोजित कट होता' असे निरीक्षण पुणे येथील सत्रन्यायालयाने नोंदविले असतानादेखील त्यामागचे सूत्रधार शोधण्यासाठी शासन काहीही प्रयत्न करत नाही ही अत्यंत खेदाची बाब आहे. कॉम्रेड पानसरे, प्रा. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचे खूनखटले देखील अजून सुरु असल्याने या चारही खूनांमागील सुत्राधारावर कारवाई होऊ शकलेली नाही. जोपर्यंत हे सूत्रधार पकडले जात नाहीत तोपर्यंत विवेकवादी कार्यकर्त्याना असलेला धोका कायम आहे"असे मत हमीद दाभोलकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा खून 20 ऑगस्ट 2013 रोजी झाला. या घटनेला बारा वर्षे पूर्ण होत आहेत. या प्रकरणातील आरोपी शरद कळसकर आणि सचिन अंदुरे या दोघांना पुणे सत्र न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा दिलेली आहे मात्र मुख्य सूत्रधार अजून मोकाट आहेत या सूत्रधारांना केंव्हा पकडणार असा संतप्त सवाल हमीद दाभोलकर यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
डॉ नरेंद्र दाभोलकरांच्या स्मृतिदिना निमित्त ऑल इंडिया पिपल सायन्स नेटवर्क यांच्या माध्यमातून देशभरात २० ऑगस्ट हा राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टीकोन दिवस म्हणून पाळला जातो. या वर्षीदेखील त्या अंतर्गत देशातील पंधरा पेक्षा अधिक राज्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार व प्रसार याविषयी कार्यक्रम केले जाणार आहेत. आदिवासी बहुल मेळघाट सारख्या भागांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीद्वारे विविध टप्प्यात अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रबोधन केले जात आहे. जादू टोण्याच्या संशयावरून महिलांची निर्वास्त्र करून धिंड काढणे, आजारातून बरे होण्यासाठी प्राण्यांची विष्ठा खाणे. चेटकिन म्हणून महिलांची हत्या करणे, नवजात बाळाच्या पोटातील दुखणे राहण्यासाठी पोटाला चटके देणे अशा अंधश्रद्धांविरुद्ध मेळघाटात समितीद्वारे जनजागृती केली जात आहे अशी माहिती नंदिनी जाधव यांनी दिली.
यावर्षी १७ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ वाजता डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृतिव्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मा. अभय ओक हे 'भारताचे संविधान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन' याविषयी व्याख्यान देतील. मा. हेमंत गोखले, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील. तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मार्फत डॉ नरेंद्र दाभोलकर स्मृती ग्रंथमाला या डॉ नरेंद दाभोलकर यांच्याविषयीच्या ५ ग्रंथांच्या संचाचे लोकार्पण महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांच्या ठिकाणी केले जाणार आहे. याविषयीचा विशेष कार्यक्रम २० ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ वाजता पुणे येथे आयोजित केला असून माजी आयपीएस अधिकारी मीरां चड्डा-बोरवणकर यांच्या हस्ते ग्रंथमालेचे प्रकाशन केले जाईल. यावेळी जेएनयूचे प्राध्यापक आणि भुरा या प्रसिद्ध आत्मचरित्राचे लेखक शरद बाविस्कर व प्रभाकर नानावटी, संपादक, नरेंद्र दाभोलकर ग्रंथमाला हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील.
हा कार्यक्रम साने गुरुजी स्मारक, सिंहगड रोड, दांडेकर पुलाजवळ, पुणे येथे होतील असे देखील या पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आले.या प्रसंगी हमीद दाभोलकर, मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव, श्रीपाल ललवाणी व अनिल वेल्हाळ उपस्थित होते.