Pune
आई धुणीभांडी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारी, वडील इलेक्ट्रिशियन म्हणून रोजंदारीवर काम करणारे... घरची परिस्थिती जेमतेम असतानाही मुलांनी शिकून मोठे व्हावे, यासाठी दोघांची धडपड सुरू होती.
त्याच कष्टांचे चीज करण्यासाठी विशाल सुनील दांगडे प्रयत्न करत होता. कॉम्प्युटर इंजिनिअर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तो बी.टेक.च्या तिसऱ्या वर्षात शिकत होता. मात्र, दिवाळीच्या सुट्टीनंतर महाविद्यालयात पहिलाच पेपर देऊन बाहेर पडलेल्या विशालचे स्वप्न बोपदेव घाटातील भीषण अपघाताने कायमचे हिरावून घेतले.
किरकटवाडी फाट्याजवळील नांदेड गावाच्या हद्दीतील जेपी नगर झोपडपट्टीत विशाल आई-वडील आणि बहिणीसोबत राहत होता. आई धुणीभांडीची कामे करते, तर वडील इलेक्ट्रिशियन असून रोजंदारीवर काम करतात. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही त्यांनी मुलांच्या शिक्षणात कमतरता पडू दिली नाही. विशालने घराजवळील शाळेत चौथीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर वडगाव येथील दांगट पाटील माध्यमिक विद्यालयात त्याचे शिक्षण झाले.
विशाल लहानपणापासूनच हुशार आणि मनमिळाऊ स्वभावाचा होता. शिक्षणाच्या जोरावर कुटुंबाची परिस्थिती बदलण्याचे स्वप्न त्याने पाहिले होते. त्यासाठी त्याने बोपदेव घाटातील ट्रिनिटी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. बी.टेक.च्या तिसऱ्या वर्षात कॉम्प्युटर सायन्स शाखेत शिकत असताना इंजिनिअर होण्याच्या दिशेने त्याची वाटचाल सुरू होती. दिवाळीच्या सुट्टीनंतर महाविद्यालयाचा पहिलाच पेपर असल्याने विशाल उत्साहाने घरातून निघाला होता. पेपर संपल्यानंतर तो बसस्टॉपवर उभा होता. घरी परतण्याची तयारी सुरू असतानाच भरधाव आयशर टेम्पोने विद्यार्थ्यांना धडक दिली. या अपघातात विशालचा मृत्यू झाला. ज्या मुलाच्या शिक्षणासाठी आई-वडील आयुष्यभर कष्ट उपसत होते, तोच मुलगा अचानक सोडून गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
विशालची बहीण अंजली हिने एमसीएचे शिक्षण पूर्ण केले असून, ती सध्या नोकरीच्या शोधात आहे. विशालच्या जाण्याने आमच्या कुटुंबाचा आधार हरपला आहे, त्याचे इंजिनिअर होण्याचे स्वप्न अर्ध्यावरच राहिले आहे. आई-वडिलांच्या कष्टांना यशाचे फळ देण्याआधीच काळाने त्याला हिरावून नेले, अशी भावना अंजली हिने व्यक्त केली.