Pune
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी शहरातील अतिक्रमणावरून प्रशासनाला लक्ष्य केल्यानंतर सतर्क झालेल्या प्रशासनाने अतिक्रमणविरोधी कारवाई तीव्र केली आहे. डेक्कन, शिवाजीनगर, कसबा पेठ, मंडई, लक्ष्मी रस्त्यानंतर आता शहरातील विविध भागांमध्ये दुकानांच्या फ्रंट आणि साइड मार्जिनमध्ये कारवाई केली जात आहे.
पाचव्या दिवशी नरवीर तानाजी मालुसरे (सिंहगड) रस्ता, वाघोली, खराडी, बिबवेवाडी, औंध, तसेच बाणेर परिसरात कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे दोन लाख १३ हजार चौरस फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले.
शहरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्याचा आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिला. त्यानंतर महापालिकेच्या बांधकाम विभागासह क्षेत्रीय कार्यालयांच्या वतीने कारवाई सुरू करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, अतिक्रमण निर्मूलन उपायुक्त सोमनाथ बनकर यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकांनी ही कारवाई केली.
माणिकबाग, धायरी फाटा आणि नऱ्हे परिसरात सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील गोयल गंगा चौपाटी व वडगाव पूल ते धायरी फाटा आणि लाडली दुकान लेन, नऱ्हे येथील मानाजीनगर येथे कारवाई करत एकूण २३,५८७ चौरस फूट क्षेत्रफळ निष्कासित करण्यात आले. कारवाईदरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. कारवाई सुरू झाल्याचे समजताच परिसरातील दुकानदारांनी स्वतःहून शेड काढून घेण्यास सुरुवात केली.
दरम्यान, ही कारवाई सुरू असताना परिसरात वाहतूककोंडी झाली होती. वाघोली परिसरात बकोरी रस्ता, हडपसरमध्ये साधना शाळेसमोर, वानवडी येथे साळुंखे विहार रस्त्यावर संयुक्त कारवाई करण्यात आली. बिबवेवाडीतील लेक टाऊन सोसायटी ते डॉल्फिन चौक ते महेश सोसायटी चौक रस्ता येथील अंदाजे ३८,२०० चौरस फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले