खडकवासला येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यासाठी केंद्रीय जलशक्ती मंत्री व केंद्रीय राज्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन
पुणे | शुक्रवार, दि. २० नोव्हेंबर २०२६
पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या १२ गावांतील नागरिकांना शुद्ध व पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी खडकवासला येथे प्रस्तावित जलशुद्धीकरण केंद्राच्या उभारणीसाठी CWPRS ची चार हेक्टर जागा पुणे महानगरपालिकेला तातडीने हस्तांतरित करण्यात यावी, अशी मागणी पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका धनश्रीताई दत्ताभाऊ कोल्हे यांनी केली आहे.
या मागणीसंदर्भात नगरसेविका धनश्रीताई कोल्हे यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री मा. श्री. सी. आर. पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मा. श्री. राजभूषण चौधरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. यावेळी केंद्रीय सहकार व नागरी उड्डाण राज्यमंत्री तथा पुण्याचे खासदार मा. श्री. मुरलीधर अण्णा मोहोळ आणि पुणे महानगरपालिकेच्या महापौर मा. सौ. मंजुषाताई नागपुरे यांच्यासमवेत या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव (ओबीसी मोर्चा) दत्ताभाऊ कोल्हे हे देखील उपस्थित होते.
समाविष्ट १२ गावांमध्ये नागरिकांना पुरेसा व शुद्ध पाणीपुरवठा मिळण्याबाबत अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी खडकवासला येथे प्रस्तावित जलशुद्धीकरण केंद्राचा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मात्र, या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली CWPRS ची चार हेक्टर जागा पुणे महानगरपालिकेला उपलब्ध होणे गरजेचे आहे.
या विषयाचा यापूर्वीही धनश्रीताई कोल्हे यांनी केंद्रीय सहकार व नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्याकडे पाठपुरावा करून जागा हस्तांतरणाची मागणी केली होती. त्यानंतर आता केंद्रीय जलशक्ती मंत्री आणि केंद्रीय राज्यमंत्री यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर करत या प्रश्नाकडे पुन्हा लक्ष वेधण्यात आले. यावेळी मुरलीधर अण्णा मोहोळ यांनीदेखील या विषयाची वस्तुस्थिती केंद्रीय मंत्र्यांसमोर मांडत जागा हस्तांतरणाची आवश्यकता अधोरेखित केली.
या बैठकीस पुणे महानगरपालिकेचे आयुक्त तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. या मागणीला केंद्रीय मंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. जागा हस्तांतरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून जलशुद्धीकरण केंद्राच्या उभारणीसाठी पुढील कार्यवाही सुरू करावी, अशी आग्रही मागणी धनश्रीताई कोल्हे यांनी केली.
समाविष्ट १२ गावांतील नागरिकांना शुद्ध आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळणे हा नागरिकांच्या मूलभूत गरजांशी संबंधित महत्त्वाचा विषय असून, हा प्रकल्प मार्गी लागेपर्यंत त्याचा सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे नगरसेविका धनश्रीताई कोल्हे यांनी सांगितले.