आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

१,६०० कोटी खर्चूनही ३२ टक्के पाणीगळती कायम! मग पुणेकरांवर पाणीकपात कशासाठी? – अमोल बालवडकर यांचा भाजपला सवाल

शरद लाटे  62   19-11-2026 09:30:32

पुणे : पुणे शहरातील २४x७ पाणीपुरवठा योजनेवर तब्बल १,६०० कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, तरीही शहरात सुमारे ३२ टक्के पाणीगळती होत असल्याची बाब समोर येत आहे. मग एवढा मोठा खर्च करूनही पुणेकरांना अपेक्षित पाणीपुरवठा का मिळत नाही? असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी उपस्थित केला आहे.

पुणे शहरात पाणीकपातीचा निर्णय घेणाऱ्या भाजपने सर्वप्रथम पाणीगळती रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या, याचा हिशेब पुणेकरांना द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

शहराच्या पाणी वितरण व्यवस्थेत दररोज सुमारे ३२ ते ४० टक्के पाणी गळतीमुळे वाया जात असल्याचे आकडेवारीतून समोर येत आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये पाणीगळती ३५ टक्क्यांवरून ३२ टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचा महापालिकेचा दावा होता. मात्र, २०२६ मध्येही सुमारे ३२ टक्के पाणीगळती कायम असल्याचे अहवालातून स्पष्ट होत आहे. यामुळे दररोज अंदाजे ५२२ दशलक्ष लिटर, तर वर्षभरात सुमारे ६ ते ७ टीएमसी पाणी वाया जात असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

२४x७ पाणीपुरवठा योजनेवर १,६०० कोटी रुपये खर्च करूनही पाणी वितरण व्यवस्थेतील गळती रोखण्यात यश आले नसेल, तर या योजनेचे नियोजन, अंमलबजावणी आणि खर्चाची जबाबदारी नेमकी कोणाची, असा सवाल बालवडकर यांनी केला.

पाणीगळती रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या असत्या, तर पुणेकरांवर पाणीकपातीची वेळ आली असती का? पाणी वाया जाण्याची जबाबदारी प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांची असताना त्याची झळ सामान्य पुणेकरांनी का सहन करायची, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

अमोल बालवडकर यांच्या प्रमुख मागण्या :

१. पुणे शहरातील पाणीगळतीचे स्वतंत्र तांत्रिक ऑडिट करण्यात यावे.

२. २४x७ पाणीपुरवठा योजनेवर खर्च झालेल्या १,६०० कोटी रुपयांचा सविस्तर लेखाजोखा जाहीर करावा.

३. दररोज होणाऱ्या ५२२ दशलक्ष लिटर पाणीगळतीचा प्रभागनिहाय अहवाल प्रसिद्ध करावा.

४. पाणीगळती रोखण्यासाठी कालबद्ध कृती आराखडा जाहीर करावा.

५. या प्रकरणात संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांची जबाबदारी निश्चित करावी.

पुणेकरांना पाणीकपात नको, तर पाणीगळतीमुक्त आणि नियोजनबद्ध पाणीपुरवठा हवा. प्रशासनाने आणि सत्ताधाऱ्यांनी पाणीगळतीचा प्रश्न गांभीर्याने घेऊन पुणेकरांना या संपूर्ण प्रकरणाचा हिशेब द्यावा, अशी ठाम भूमिका अमोल बालवडकर यांनी मांडली.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.