पुणे प्रतिनिधी : बाणेर-बालेवाडी परिसरातील वाढत्या अतिक्रमणांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, परिसरातील अनधिकृत अतिक्रमणे तातडीने हटविण्यात यावीत, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे पुणे शहरातील नेते गणेश कळमकर यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे ट्विटच्या माध्यमातून केली आहे.
बाणेर-बालेवाडी परिसरात सार्वजनिक रस्ते, पदपथ तसेच नागरिकांच्या रहदारीला अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमणांमुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित विभागामार्फत तातडीने पाहणी करावी आणि नियमबाह्य अतिक्रमणांवर कारवाई करावी, अशी मागणी गणेश कळमकर यांनी केली आहे.
यावेळी त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रोडवरील अतिक्रमणांच्या प्रश्नाचाही संदर्भ दिला. फर्ग्युसन कॉलेज रोडवर सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक असतानाही अतिक्रमणांच्या प्रश्नावर आंदोलन करण्यात आले आणि त्यानंतर हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न झाले, असे त्यांनी नमूद केले.
सत्ताधारी पक्षात असलो तरी नागरिकांच्या प्रश्नांवर आवाज उठविणे ही आपली जबाबदारी आहे. सत्ता कोणाचीही असो, नागरिकांच्या हितासाठी आणि त्यांच्या मूलभूत समस्यांच्या सोडवणुकीसाठी आपण सदैव तत्पर राहिले पाहिजे. नागरिकांना त्रास होत असेल, तर त्या प्रश्नावर ठामपणे भूमिका घेणे आवश्यक आहे,अशी भूमिका गणेश कळमकर यांनी मांडली.
बाणेर-बालेवाडी परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करताना कोणताही राजकीय विचार न करता नागरिकांचे हित प्राधान्याने लक्षात घ्यावे, असेही त्यांनी अधोरेखित केले.
दरम्यान, महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी या मागणीची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश द्यावेत आणि बाणेर-बालेवाडी परिसरातील अतिक्रमणांचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
नागरिकांना मोकळे रस्ते, सुरक्षित पदपथ आणि अतिक्रमणमुक्त परिसर मिळावा, यासाठी गणेश कळमकर यांनी महापालिका प्रशासनाकडे हा प्रश्न लावून धरला आहे.