Pune
उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर आज जोरदार हल्ला चढवला. 'अजित पवार यांच्या हयातीत त्यांच्यावर 70 हजार कोटींच्या कथित सिंचन घोटाळ्याचे आरोप करून त्यांचे जगणे मुश्किल करण्यात आले.
त्याच अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण शहा यांच्या हस्ते होणे हे दुर्भाग्य आहे. अनावरण केल्यानंतर शहांनी पुतळ्यासमोर नाक रगडून माफी मागायला हवी होती. आम्ही तुमच्यावर केलेले आरोप खोटे होते, तुम्ही थोर होता असे त्यांनी म्हणायला हवे होते,' असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. 'शहांनी काल दादांची जी थोरवी गायली, त्यातील दोन शब्द जरी त्यांच्या हयातीत बोलले असते तरी त्यांना समाधान मिळाले असते,' असा टोलाही त्यांनी हाणला.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कोरोना काळात मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे फोनही घेत नव्हते, असे शहा म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचा उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. अमित शहा हे किती दिवसांनी अवतीर्ण झाले, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांना केला. शहा हे चकाटय़ा पिटणारे गृहमंत्री आहेत. चकाटय़ा पिटण्यापेक्षा त्यांनी मणिपूरमध्ये जावे. अरुणाचल प्रदेशात लोक आक्रोश करत आहेत, तेथील लोकांचे फोन शहा घेत नाहीत. शहा हे खरोखरच शूर असतील, त्यांना गृहमंत्री असल्याची जाणीव असेल तर त्यांनी तिथल्या सैन्याच्या छावणीत जाऊन बसले पाहिजे, सैनिकांचे मनोधैर्य वाढवले पाहिजे, चीनविरोधात सैन्यासोबत लढणाऱया अरुणाचल प्रदेशातील नागरिकांचे मनोबल उंचावले पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी सुनावले.
शहांसारख्या निर्बुद्धांसमोर बोलणे म्हणजे 'गाढवापुढे वाचली गीता'
उद्धव ठाकरे यांनी यावेळी एका व्हिडीओ क्लिपचा दाखला दिला. ते म्हणाले, 'कोरोना काळात महाराष्ट्राच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कामगिरीचा त्या क्लिपमध्ये उल्लेख आहे. त्यावेळी मी मुख्यमंत्री होतो. अर्थात त्या कामगिरीचे श्रेय संपूर्ण सरकारी यंत्रणेचे होते. पण शहांसारख्या निर्बुद्ध माणसाला हे सांगणे म्हणजे गाढवापुढे गीता वाचण्यासारखे आहे. गीता वाचून दाखवली तरी गाढवाला काय कळणार?' अशी सणसणीत चपराक उद्धव ठाकरे यांनी हाणली.
हे भंपक लोक लवकरात लवकर सत्तेतून गेले पाहिजेत!
कोरोना काळात मी फोन घेतले नाहीत असे शहा म्हणतात. त्यांचे म्हणणे खरे असते तर त्या काळात उत्तर प्रदेशमध्ये जसे गंगेत मृतदेह सोडण्यात आले, शहांच्या गुजरातमध्ये जशा सार्वजनिक ठिकाणी चिता पेटलेल्या दिसल्या, तसे चित्र महाराष्ट्रात दिसले असते, असे उद्धव ठाकरे यांनी सुनावले. महाराष्ट्रात धारावीसह सर्व भागांत संपूर्ण यंत्रणा प्रभावीपणे काम करत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थाळ्या वाजवून जे साध्य झाले नाही, ते महाराष्ट्राने आपल्या कामातून करून दाखवले होते. त्यामुळे अमित शहा यांचा हा सगळा भंपकपणा आहे. असे भंपक लोक लवकर घालवले पाहिजेत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
विलीनीकरणाचा निर्णय अजितदादांच्या पुतळ्यासमोरच व्हायला हवा!
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेवरही उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते होते. त्या पुतळ्यासमोर बसूनच त्यांनी निर्णय घ्यायला हवा, असे उद्धव ठाकरे म्हणाले. विलीनीकरण होणार असेल तर एनडीएमध्ये सहभागी व्हायचे अशीही एक चर्चा आहे. त्यावर तुमचे काय मत आहे, असे पत्रकारांनी विचारले असता, 'तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. मी काय सांगू? माझं मत त्यांनी विचारात घेतलं किंवा मला विचारलं तर सांगेन,' असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.