Pune
राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमच्या पक्षात विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव नाही आणि त्यावर आता कोणतीही चर्चा सुरू नाही,” असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला आहे.
मात्र, याच वेळी त्यांनी एक मोठा दावा करत, “माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांनी स्वतः मला दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाची तारीख सांगितली होती,” असे विधान केले आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर रोहित पवार यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी अजितदादांसोबत विलीनीकरणाबाबत चर्चा झाल्याचा खुलासा केला होता. आता सुनील तटकरे यांच्या नव्या दाव्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा जोरदार खळबळ उडाली आहे. 'द इंडियन एक्सप्रेस'ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.
‘१२ फेब्रुवारीला होणार होते विलीनीकरण’
सुनील तटकरे यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना या घडामोडींवर सविस्तर भाष्य केले. तटकरे म्हणाले, “सध्या विलीनीकरणाचा विषय पूर्णपणे संपलेला आहे. अजित पवारांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय परिस्थिती बदलली आहे. आता सुनेत्रा पवार आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा झाल्या आहेत, तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनीही विलीनीकरणाची शक्यता फेटाळून लावली आहे.”
१० नोव्हेंबरनंतर विलीनीकरण होणार का? या प्रश्नाला उत्तर देताना तटकरे म्हणाले, “आमचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती. त्यावेळी १० नोव्हेंबरच्या बैठकीबाबत काही चर्चा झाली. मात्र, विलीनीकरणाचा अध्याय आता कायमचा बंद झाला आहे. पण, जर आज अजित पवार हयात असते, तर १२ फेब्रुवारी रोजी दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाले असते. कारण स्वतः अजितदादांनीच मला ही तारीख सांगितली होती.”
आधी नकार आणि आता स्वीकार… तटकरेंचे स्पष्टीकरण काय?
२८ जानेवारी रोजी अजित पवार यांच्या निधनानंतर रोहित पवारांसह राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी विलीनीकरणाच्या चर्चांवर वक्तव्ये केली होती. मात्र, त्यावेळी सुनील तटकरेंनी अशा कोणत्याही चर्चांची माहिती नसल्याचे म्हटले होते.
त्यावेळी नकार देऊन आताच हा खुलासा का केला? या प्रश्नावर बोलताना तटकरे म्हणाले, “मी तेव्हा का नकार दिला आणि आज का बोललो, हा माझा राजकीय निर्णय आहे. मी राजकारणी आहे. कोणत्या प्रसंगी कोणते वक्तव्य करायचे हे मला चांगले ठाऊक आहे. त्या वेळी परिस्थिती वेगळी होती, त्यामुळे तेव्हा जाहीरपणे बोलणे योग्य वाटले नाही.” भविष्यात विलीनीकरण शक्य आहे का? यावर तटकरे म्हणाले, “आता पक्षाचे सामूहिक नेतृत्व आणि राष्ट्रीय अध्यक्षा यावर अंतिम निर्णय घेतील.”