आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला! ३ नोव्हेंबरला पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

शरद लाटे  37   27-10-2026 13:12:40

Pune 

माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिका क्रमांक तीनचे उद्घाटन ३ नोव्हेंबरला करण्याचे निश्चित झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रस्तावित पुणे दौरा पुढे ढकलला असला,

तरी मेट्रोचे उद्घाटन त्यांच्या हस्ते ऑनलाइन (व्हर्च्युअल) पद्धतीने करण्याचे नियोजन सुरू आहे. उद्घाटनाचा सोहळा बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री प्रत्यक्ष उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) माध्यमातून सार्वजनिक-खासगी भागीदारीत माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या सुमारे २३ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिकेचे काम करण्यात येत आहे. माहिती तंत्रज्ञाननगरी हिंजवडी आणि पुणे शहराला जोडणाऱ्या या मार्गिकेवरील प्रवासी सेवा सुरू होण्याची नागरिकांना प्रतीक्षा आहे. या मार्गिकेवरील बहुतांश कामे पूर्णत्वाकडे असून, प्रवासी सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक प्रक्रिया राबविण्यात येत आहेत.

मेट्रोच्या उद्घाटनासाठी यापूर्वी काही तारखा चर्चेत आल्या होत्या. विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कार्यक्रम लांबणीवर पडला होता. आता ३ नोव्हेंबरला कार्यक्रम आयोजित करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा पुढे ढकलल्याने कार्यक्रम लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त होत होती. मात्र, पंतप्रधान व्हर्च्युअल पद्धतीने कार्यक्रमात सहभागी होणार असल्याने नियोजित तारखेलाच उद्घाटन होण्याची शक्यता आहे.

बालेवाडी स्टेडियमवर होणाऱ्या या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत. मात्र, कार्यक्रमाचे स्वरूप आणि प्रवासी सेवा सुरू होण्याबाबत अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर याबाबतची अधिकृत घोषणा होणे अपेक्षित आहे.

प्रवासी सेवा सुरू होण्याकडे लक्ष

माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेमुळे हिंजवडी आयटी पार्क, बालेवाडी, बाणेर आणि शिवाजीनगर परिसरातील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. मार्गिकेवरील २३ स्थानकांपैकी पहिल्या टप्प्यात किती स्थानके खुली होणार आणि प्रत्यक्ष प्रवासी सेवा कधीपासून सुरू होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.