आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

धायरी-बेनकर वस्तीच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमी कटिबद्ध – नगरसेवक हरिदास चरवड

शरद लाटे  77   26-10-2026 09:52:52

१९ वे ‘जनसंवाद अभियान’ उत्साहात संपन्न; ऋतूनगरीतील ड्रेनेज समस्येवर तातडीने कार्यवाहीचे आश्वासन

धायरी | प्रतिनिधी

नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक हरिदास कृष्णा चरवड यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणारे १९ वे ‘जनसंवाद अभियान’ धायरी-बेनकर वस्ती येथील ऋतूनगरी परिसरात उत्साहात संपन्न झाले. या अभियानाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

नागरिकांच्या समस्या थेट जाणून घेऊन त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी नगरसेवक हरिदास चरवड दर रविवारी आपल्या प्रभागातील विविध भागांत जनसंवाद अभियानाचे आयोजन करतात. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांच्या नागरी समस्या समजून घेऊन संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने त्यांचे निराकरण करण्यावर भर दिला जात आहे.

या जनसंवाद अभियानादरम्यान नागरिकांनी प्रामुख्याने ड्रेनेज व्यवस्था, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, कचरा व्यवस्थापन, पथदिवे, महावितरणच्या अडचणी तसेच सार्वजनिक वाहतुकीसंदर्भातील प्रश्न मांडले. यावेळी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत समस्यांची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

ऋतूनगरी परिसरातील ड्रेनेजचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत नगरसेवक हरिदास चरवड यांनी ऋतूनगरी परिसरात नवीन ड्रेनेज लाइनचे काम करून देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे अनेक वर्षांपासून या सुविधेच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणार

जनसंवाद अभियानाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी वारंवार त्रास सहन करावा लागू नये, यासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधून प्रश्न मार्गी लावण्यावर भर दिला जाईल. धायरी-बेनकर वस्तीतील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण नेहमी कटिबद्ध राहणार असल्याचे नगरसेवक हरिदास चरवड यांनी यावेळी सांगितले.

या उपक्रमामुळे नागरिकांना आपल्या समस्या थेट लोकप्रतिनिधींसमोर मांडण्याची संधी मिळत असून, जनसंवाद अभियानाला मिळणारा प्रतिसादही वाढत आहे. नागरिकांच्या प्रश्नांचे प्रभावी निराकरण करण्यासाठी असे अभियान यापुढेही सातत्याने राबविण्यात येणार आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.