आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

ऐन दुष्काळात Dombivli मध्ये पाण्याची नासाडी; कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे दररोज शेकडो लिटर पाणी वाया

नितीन देशपांडे   21   17-10-2026 16:45:26

Pune एकीकडे कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाई (Water shortage) असताना आणि भर पावसात पाण्यासाठी रहिवाशांचे मोर्चे निघत असताना दुसरीकडे पश्चिम डोंबिवलीतील जयहिंद कॉलनी भागात असलेल्या गावदेवी जलकुंभावर मात्र शासनाच्या पाणी बचावाच्या आवाहनाला हरताळ फासला जात आहे.

दररोज शेकडो लिटर पिण्याचे पाणी उघड्यावर वाया जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या जलकुंभावर टँकर भरताना कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे दररोज शेकडो लिटर पाणी वाया जात असल्याचे दिसून येते.

पश्चिमेतील जयहिंद कॉलनी भागातील गावदेवी जलकुंभावरून टँकरने शहराच्या विविध पाणी टंचाई (Water shortage) असलेल्या भागात दररोज पाणीपुरवठा केला जातो. दररोज हे टँकर जलकुंभाच्या वाहिकेतून भरले जात असतात. टँकर भरत असताना तेथे नियमाप्रमाणे चालक आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) पाणीपुरवठा विभागाचा नियंत्रक कर्मचारी उपस्थित राहणे बंधनकारक असताना प्रत्यक्षात मात्र दोघेही तेथे थांबत नाहीत. टँकरला पाईप लावून चालक आणि नियंत्रक कर्मचारी चहा पिण्यासाठी जलकुंभाच्या परिसरात निघून जातात आणि गप्पा मारण्यात गुंग होतात. परिणामी टँकर पूर्ण भरून ओसंडून वाहू लागल्यानंतरही सुमारे २० मिनिटे जलकुंभाकडून आलेली वाहिका बंद करण्यासाठी तेथे कोणीच नसते. या काळात शेकडो लिटर अमूल्य पाणी रस्त्यावर वाहून जाते.

कल्याण-डोंबिवलीच्या अनेक भागांत नियमित पाणी टंचाई आहे. पाणी मिळण्यासाठी त्रस्त रहिवाशांचे भर पावसात मोर्चे निघाले आहेत. आता तर दुष्काळाचे गंभीर सावट घोंघावत आहे. अशा परिस्थितीत पाणी जपून वापरण्यासाठी शासनाने कठोर निर्देश दिले असून पाण्याच्या बेसुमार वापरावर निर्बंध आले आहेत. तरीही कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या या जलकुंभावर अशा पद्धतीने पाण्याची नासाडी होत असल्याने रहिवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे. परिसरातील रहिवासी दररोज हे फुकट जाणारे पाणी उघड्या डोळ्यांनी पाहत असतात. जलकुंभ असलेल्या भागातील अनेक रहिवासी घरातून बाहेर येऊन हे पाणी थांबवता येते का याची चाचपणी करतात. पण त्यांना टँकरला जोडलेल्या पंपाची बंद करण्याची तांत्रिक माहिती नसल्याने त्यांचा हिरमोड होतो.

आयुक्तांनी दखल घेण्याची गरज

या संदर्भात उमेशनगर येथील रहिवासी मकरंद माडखोलकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सांगितले की, केडीएमसीच्या गावदेवी जलकुंभावर नियमित टँकरमध्ये पाणी भरणी सुरू झाली की तेथील पाणीपुरवठा नियंत्रक तेथून गायब होतो. टँकर चालक चहा-पाण्यासाठी बाहेर जातो. तोपर्यंत टँकर भरून शेकडो लिटर पाणी फुकट जाते. शहराच्या अनेक भागात पाणी टंचाई असताना अशा परिस्थितीत पाणी फुकट जाणे अजिबात योग्य नाही. आयुक्त अभिनव गोयल (Abhinav Goel) यांनी या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेतली पाहिजे.

कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद

या प्रकाराबत केडीएमसीच्या पाणीपुरवठा विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने प्रतिक्रिया देताना अशा प्रकारे पाणी फुकट जाणे योग्य नसल्याचे सांगितले. अशा प्रकारे पाणी फुकट जात असल्याचे आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई केली जाईल. या पुढे केडीएमसीच्या टँकर भरत असलेल्या सर्व जलकुंभांवरील कर्मचाऱ्यांना ताकीद देण्यात आली आहे. टँकरमध्ये पाणी भरत असताना कर्मचाऱ्यांना तेथेच थांबण्याच्या आणि पाण्याचा एकही थेंब फुकट जाणार नाही अशा सक्त सूचना दिल्या जातील असे सांगितले. तरीही प्रत्यक्षात कारवाई होईपर्यंत डोंबिवलीकरांचे अमूल्य पाणी असेच रस्त्यावर वाहत राहणार का असा सवाल रहिवासी विचारत आहेत.

 


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.