आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

पुण्यात बाईक टॅक्सीवर बंदी का? २५ रुपयांत होणारा प्रवास आता १०० रुपयांत;

नितीन देशपांडे   17   17-10-2026 16:41:04

कमी अंतराचा प्रवास आणि बस-थांबे, मेट्रो-थांब्यांपर्यंत पोहोचण्यासाठी बाईक-टॅक्सीचा पर्याय परवडणारा असून, या सेवा सुरू ठेवण्याची मागणी पुण्यातील प्रवाशांनी निवेदनाद्वारे केली आहे.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत बाईक टॅक्सीची सेवांबाबत सरकारी नियमांची पूर्तता होत नसून, या सेवा तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले. त्यानंतर प्रवाशांकडून बाईक टॅक्सीचा पर्याय परवडणारा असून, या सेवांमुळे रोजच्या प्रवासखर्चात मोठी बचत होते. कमीत कमी पैशांमध्ये 'मेट्रो', 'पीएमपी'च्या थांब्यांपर्यंत पोहचणे शक्य होत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

विमाननगर येथील विद्यार्थिनी अंजली त्रिपाठी म्हणाल्या, 'मी विमाननगर परिसरात नियमितपणे बाईक-टॅक्सीने प्रवास करते. एका प्रवासासाठी साधारण २५ ते ३० रुपये खर्च येतो. मात्र, त्याच अंतरासाठी रिक्षा किंवा कॅबचे भाडे सुमारे ७० ते १०० रुपयांपर्यंत असते.'

रोजच्या प्रवासातील बरेचसे अंतर सार्वजनिक वाहतुकीने पूर्ण होते. मात्र, स्थानकापर्यंत पोहोचणे आणि तिथून इच्छित ठिकाणी जाणे, हा अनेकदा अडचणीचा भाग असतो. बाईक-टॅक्सीमुळे हा प्रवास कमी वेळेत पूर्ण करता येतो. हा पर्याय उपलब्ध नसल्यास अधिक वेळ वाट पाहावी लागते. जास्त अंतर चालावे लागते किंवा दुसऱ्या वाहतूक पर्यायासाठी अधिक पैसे खर्च करावे लागतात,' असा अनुभव एका प्रवाशाने सांगितला.

'या सेवेमुळे अनेकांना रोजगाराची संधीही उपलब्ध झाली आहे. मला मिळणाऱ्या बहुतांश राइड्स कमी अंतराच्या असतात. कार्यालये, महाविद्यालये, मेट्रो स्थानके किंवा जवळच्या परिसरात जाण्यासाठी प्रवासी या सेवेचा वापर करतात. एका दिवशी सुमारे १७ राइड्स पूर्ण करतो. त्यातून सुमारे ९५० रुपये मिळतात. हेच माझ्या उत्पन्नाचे साधन आहे,' असे हडपसर येथील बाईक-टॅक्सी चालकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.