आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजार रुपयांचे अग्रिम अर्थसाहाय्य; देवाभाऊंच्या निर्णयाचे भाजपा जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्याकडून स्वागत!

शरद लाटे  355   16-10-2026 14:21:26

कर्जवसुलीला लगाम, विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या महायुती सरकारचे अभिनंदन

पिंपरी-चिंचवड, दि. १६ ऑक्टोबर २०२६ : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने घेतलेल्या निर्णयांचे भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. शत्रुघ्न (बापू) काटे यांनी स्वागत केले असून, शेतकऱ्यांच्या हितासाठी संवेदनशील भूमिका घेतल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांचे अग्रिम अर्थसाहाय्य देण्याचा निर्णय हा बळीराजाला मोठा दिलासा देणारा आहे. त्याचबरोबर दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना कर्जवसुलीच्या तगाद्यातून दिलासा देणे, विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करणे, पिण्याच्या पाण्याचे नियोजन आणि जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करणे, या उपाययोजना महत्त्वपूर्ण असल्याचे श्री. काटे यांनी नमूद केले.

दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे ही सरकारची जबाबदारी आहे. महायुती सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याबरोबरच त्यांच्या कुटुंबांवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी विविध उपाययोजनांवर भर दिला आहे. दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कातून सवलत देण्याचा निर्णयही ग्रामीण भागातील कुटुंबांसाठी दिलासादायक आहे, असे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना मदत देतानाच जनावरांसाठी पुरेसा चारा उपलब्ध व्हावा, यासाठी चारा पिकांचे नियोजन आणि आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना वीजपुरवठा, पीकविमा, पीएम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी यांसारख्या योजनांमधून शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळत आहे. अशा संकटाच्या काळात शासनाच्या मदतकार्याला सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे, असेही श्री. काटे यांनी स्पष्ट केले.

दुष्काळ ही गंभीर नैसर्गिक आपत्ती असून, या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राजकारणापलीकडे जाऊन सामूहिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राजकीय आरोप-प्रत्यारोप करण्याऐवजी त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्व पक्षांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

“राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याच्या संकल्पाला साथ द्या!”

“पीएम किसान सन्मान निधी, नमो शेतकरी महासन्मान निधी, शेतकऱ्यांसाठी विविध आर्थिक सहाय्य योजना आणि दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांचे अग्रिम अर्थसाहाय्य अशा उपाययोजनांमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बळीराजाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे ही काळाची गरज आहे. महाराष्ट्राला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांना सर्वांनी साथ द्यावी. विरोधकांनीही राजकारण न करता शेतकरी आणि जनतेच्या हिताला प्राधान्य द्यावे,” असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. शत्रुघ्न (बापू) काटे यांनी केले


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.