Pune
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून महायुतीमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या जागेवरून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये एकमत होऊ न शकल्याने अखेर मैत्रीपूर्ण लढतीचा मार्ग स्वीकारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
त्यामुळे पुणे शिक्षक मतदारसंघात नेमकी कोण बाजी मारणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सुरुवातीपासूनच जागेसाठी प्रयत्न सुरू होते. दुसरीकडे, भाजपदेखील ही जागा सोडण्यास तयार नसल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे मंगेश चिवटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांना पक्षाकडून एबी फॉर्मही देण्यात आला होता. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतर चिवटे यांनी निवडणुकीतून माघार घेतली.
मंगेश चिवटे यांच्या माघारीनंतर शिंदे गटाची पुढील भूमिका काय असेल, याबाबत राजकीय चर्चांना उधाण आले होते. दरम्यान, शिंदे गटाने अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. सचिन सानप हे मंत्री उदय सामंत यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जातात. त्यामुळे या निवडणुकीतील समीकरणांना आणखी महत्त्व प्राप्त झाले आहे. दुसरीकडे, भाजप आणि महायुतीतील इतर मित्रपक्ष कौस्तुभ गावडे यांना पाठिंबा देणार असल्याची माहिती आहे. परिणामी, एकाच महायुतीतील दोन घटक पक्ष वेगवेगळ्या उमेदवारांच्या बाजूने उभे राहणार असल्याने पुणे शिक्षक मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळणार आहे. या निर्णयामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा चर्चेत आले आहेत. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन येथील निवासस्थानी पक्षातील वरिष्ठ नेत्यांची बैठक झाल्याचे सांगितले जात आहे. शिंदे नाराज असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या.
एकूणच, मंगेश चिवटे यांनी माघार घेतल्यानंतरही पुणे शिक्षक मतदारसंघातील लढत संपलेली नाही. उलट, शिवसेना शिंदे गटाने सचिन सानप यांना पाठिंबा दिल्याने आणि भाजपने कौस्तुभ गावडे यांच्या बाजूने भूमिका घेतल्याने निवडणुकीतील चुरस वाढण्याची शक्यता आहे. आता या निवडणुकीत मतदार कोणाला पसंती देतात आणि या लढतीचा महायुतीच्या राजकारणावर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.