आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

महाराष्ट्र आणि यूकेमधील भागीदारीतून गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि रोजगारनिर्मितीला चालना

नितीन देशपांडे   181   13-10-2026 21:43:21

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि युनायटेड किंगडमचे व्यवसाय, नवोन्मेष, विज्ञान आणि व्यापार विषयक राज्य सचिव जोनाथन रेनॉल्ड्स यांच्या हस्ते मुंबई येथे व्यापार, गुंतवणूक आणि आर्थिक सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी शासनस्तरीय समन्वय आणि उद्योग-व्यवसायाभिमुख सहकार्याची सुनियोजित यंत्रणा असलेल्या ‘यूके-महाराष्ट्र ग्रोथ पार्टनरशिप’चा अधिकृत शुभारंभ करण्यात आला.

 

कौशल्य, भांडवल आणि तंत्रज्ञानाची सांगड घालणाऱ्या ठोस गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रात उत्कृष्ट परिसंस्था कार्यरत आहे. सर्वच क्षेत्रांतील उद्योगांना गुंतवणुकीसाठी पोषक परिसंस्था निर्माण करण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे, अशा शब्दांत महाराष्ट्राचे महत्त्व अधोरेखित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युनायटेड किंगडममधील संस्था आणि उद्योजकांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले.

 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, गुंतवणूकदारांचे प्रकल्प वेगाने पुढे नेण्यासाठी ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ या व्यासपीठाच्या माध्यमातून सर्व संबंधित यंत्रणांशी तातडीने समन्वय साधला जाईल. यूकेमधील सचिव, महापौर आणि अधिकारी यांचा हा दौरा केवळ औपचारिक भेट नसून, दोन्ही देशांमधील महत्त्वाकांक्षेचे प्रत्यक्ष व्यवसाय आणि करारांमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न आहे.

 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबई आंतरराष्ट्रीय वित्त, व्यापार आणि उद्योजकतेला जागतिक बाजारपेठांशी थेट जोडते. पुणे हे अभियांत्रिकी, वाहन उद्योग, उत्पादन आणि माहिती तंत्रज्ञानाचे प्रमुख केंद्र बनले आहे. राज्यभरातील कुशल मनुष्यबळ, सक्षम औद्योगिक समूह आणि जागतिक ग्राहकांना सेवा देणाऱ्या अनुभवी भागीदारांचे मजबूत जाळे ही महाराष्ट्राची ताकद आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे परदेशी विद्यापीठांना महाराष्ट्रात कॅम्पस सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. ‘युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टल’, ‘युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क’ आणि ‘युनिव्हर्सिटी ऑफ ॲबर्डिन’ यांसारखी जागतिक विद्यापीठे महाराष्ट्रात येत आहेत. राज्यात उभारण्यात येणाऱ्या एज्युसिटी, मेडिसिटी आणि एआय इनोव्हेशन सिटीमुळे जागतिक दर्जाचे संशोधन, संस्था आणि प्रतिभा एकत्र येतील.

महाराष्ट्रात औद्योगिक कार्बन उत्सर्जन कमी करणे, ऊर्जा कार्यक्षमता वाढविणे, पाणी व्यवस्थापन, वाहतूक आणि साधनसंपत्तीचे पुनर्नवीकरण यांसारख्या क्षेत्रांत स्वच्छ ऊर्जा प्रकल्पांना मोठा वाव आहे. जागतिक कंपन्यांना त्यांची ‘ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स’ आणि तंत्रज्ञान संशोधन केंद्रे महाराष्ट्रात उभारण्यासाठी राज्य सरकार पूर्ण सहकार्य करेल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

या भागीदारीमुळे महाराष्ट्रातील स्थानिक उत्पादक, अन्नप्रक्रिया उद्योग, तंत्रज्ञान कंपन्या आणि लघुउद्योजकांना ब्रिटनमध्ये नव्या बाजारपेठा आणि ग्राहक मिळविण्याची संधी उपलब्ध होईल. येत्या काळात महाराष्ट्र आणि ब्रिटनमधील संबंध प्रत्यक्ष उद्योग, व्यवसाय आणि रोजगारनिर्मितीच्या माध्यमातून अधिक दृढ होतील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

यावेळी मंत्री जयकुमार रावल, ब्रिटिश उच्चायुक्त लिंडी कॅमेरॉन, ब्रिटनमधील विविध शहरांचे महापौर, ब्रिटन आणि महाराष्ट्रातील नेते व वरिष्ठ अधिकारी तसेच उद्योग जगतातील प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.