Pune
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि गैरप्रकारांविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर तोडगा निघाल्यानंतरही राजकीय वाद सुरूच आहे.
वकील गुणरत्न सदावर्ते यांनी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या नियुक्तीवर प्रश्न उपस्थित करत आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या चौकशीबाबत आक्षेप घेतला आहे. विद्यार्थ्यांना आंदोलनातून काहीही मिळणार नाही, तर या आंदोलनाचा राजकीय फायदा घेतला जात आहे, अशी टीकाही त्यांनी केली. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.
'तुकाराम मुंढे भीमनवारांची चौकशी कशी करणार?'
गुणरत्न सदावर्ते यांनी MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या चौकशी समितीतील तुकाराम मुंढे यांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला. आयोगाच्या अध्यक्षांविरोधातील चौकशीत मुंढे यांची सचिव म्हणून नियुक्ती योग्य नसल्याचा दावा त्यांनी केला. निवृत्त न्यायमूर्तींकडून होणाऱ्या चौकशीबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.सदावर्ते यांच्या मते, या चौकशी प्रक्रियेत कायदेशीर आणि प्रशासकीय अधिकारांचा विचार करणे आवश्यक आहे.
चौकशी समितीच्या अध्यक्षपदी माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले
MPSC परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय चौकशी आयोगाची घोषणा केली आहे. या आयोगाच्या अध्यक्षपदी माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या समितीत माजी न्यायाधीश पी. डी. नाईक, पोलीस महानिरीक्षक लखमी गौतम आणि निवृत्त अधिकारी गणेश पाटील यांचाही समावेश असल्याचे वृत्त आहे. चौकशी दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्याकडील पुरावे समितीसमोर सादर करण्याची संधीही देण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांच्या हातात काहीच आले नाही'
पुण्यातील आंदोलनाचे नेतृत्व आणि त्याला मिळालेला राजकीय पाठिंबा यावरही सदावर्ते यांनी टीका केली. आमदार रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा राजकीय फायदा घेतल्याचा आरोप त्यांनी केला. आंदोलनात विविध राजकीय व्यक्ती सहभागी झाल्या, पण विद्यार्थ्यांच्या मूळ प्रश्नांचे काय झाले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सदावर्ते यांनी नवनाथ बनसोडे यांच्यासारख्या व्यक्तींना लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप केला. तसेच, या आंदोलनात विद्यार्थ्यांचा वापर राजकीय हेतूंसाठी झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश?
MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी चौकशी पूर्ण होईपर्यंत पदावर कार्यरत न राहता सक्तीच्या रजेवर जाण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांनी समाजमाध्यमांवरील संदेशातून चौकशी पूर्ण होईपर्यंत पदापासून दूर राहणार असल्याचे स्पष्ट केले.
भीमनवार यांच्या निर्णयानंतर आणि सरकारकडून विविध मागण्यांवर आश्वासन मिळाल्यानंतर पुण्यातील विद्यार्थ्यांनी ११ दिवसांचे आंदोलन मागे घेतले. MPSC परीक्षांमधील कथित पेपरफुटी, भरती प्रक्रियेतील पारदर्शकता आणि आयोगाच्या कामकाजाबाबत विद्यार्थ्यांनी अनेक मागण्या मांडल्या होत्या. सरकारने चौकशी आयोग, रिक्त पदांची भरती, गट-क पदसंख्येत वाढ आणि आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासंबंधी आश्वासने दिले.