सध्या राजधानी दिल्लीला छावणीचं स्वरुप आलंय. कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच सीजेपीने केलेल्या आवाहनानंतर हजारो लोक दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर पोहोचत आहेत. लोकांनी एकत्र जमू नये म्हणून पोलिसांकडून कारवाई केली जातेय.
तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, यूट्यूबर ध्रुव राठी यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सोबतच सीजेपीचे प्रमुख अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि सौरभ दास यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आता या आंदोलनाचे नेतृत्त्व सीजपीचे अजिंक्य शिंदे करत आहेत. त्यांनी अभिजीत दीपके यांची जागा घेतलीय. असे असतानाच आता अजिंक्य शिंदे यांनी देशातील नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे.
तुम्ही हा व्हिडीओ पाहात असाल तर…
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अभिजीत दीपके यांचा एक व्हिडीओ सीजेपीने पोस्ट केला. या व्हिडीओत दीपके यांनी अजिंक्य शिंदे दिल्लीच्या आंदोलनाचे नेतृत्त्व करतील असे सांगितले. “तुम्ही हा व्हिडीओ पाहात असाल तर आम्ही अटक झालेलो आहोत असं समजावे. आमच्यानंतर या आंदोलनाचे नेतृत्त्व अजिंक्य शिंदे करतील. मी सर्वांनाच आवाहन करतो की अजिंक्य शिंदे जे सांगतील त्याचे पालन करावे,” असे आवाहनही दीपके यांनी व्हिडीओत केले आहे.
सरकार देशाच्या एकजुटतेला पुन्हा एकदा घाबरलं
या व्हिडीओनंत अजिंक्य शिंदे यांनीही सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केलाय. या व्हिडीओत त्यांनी लोकांनी जास्तीत जास्त संख्येने दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर जमावे, असे आवाहन केलेय. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही त्यांनी टीका केलीय. “अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि सौरभ दास या तिघांना मोदी, शाह यांच्या हुकूमशाही सरकारने ताब्यात घेतलं. दिल्लीच्या विमानतळावरच त्यांना ताब्यात घेण्यात आलं. हे हुकूमशाही सरकार देशाच्या एकजुटतेला पुन्हा एकदा घाबरलं आहे. गेल्या वेळीदेखील संपूर्ण देश दिल्लीच्या जंतर-मंतरवर एकत्र आला होता. त्यावेळी आपण मोदी-शाह यांचा अहंकार धुळीस मिळवला होता,” असा हल्लाबोल अजिंक्य शिंदे यांनी केला.
आता नव्या लढाईला सुरुवात
तसेच, लोक जंतर-मंतर मैदानावर पोहोचू नयेत म्हणून सरकारने बसेस बंद केल्या. ट्रेन बंद केल्या. दिल्लीत येणाऱ्या लोकांना ताब्यात घेण्यात आलं. मोदी शाह यांची भीती म्हणजे आपण अर्धी लढाई जिंकल्याचं द्योतक आहे. आता नव्या लढाईला सुरुवात झाली आहे. ज्या लोकांचा मतदानाचा अधिकार चोरीला गेलेला आहे तो परत मिळावा हीच आमची मागणी आहे, अशी भूमिकाही शिंदे यांनी मांडली.