आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

Pune Inner Ring Road Land Acquisition: पुणे इनर रिंग रोडच्या भूसंपादनाला वेग; मुळशी, हवेलीत जमीन मोजणीच्या तारखा निश्चित

शिंदे राम   157   10-10-2026 11:09:34

PUNE 

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील वाहतूक कोंडीवर शाश्वत तोडगा काढण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या प्रस्तावित 'इनर रिंग रोड'च्या भूसंपादन प्रक्रियेला गती मिळत आहे.

मुळशी, मावळ आणि हवेली तालुक्यांतील विविध गावांमध्ये आयोजित मोजणीपूर्व ग्रामबैठकांना ग्रामस्थांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, मुळशीतील चार गावांमध्ये प्रत्यक्ष जमीन मोजणीच्या तारखाही निश्चित करण्यात आल्या आहेत. हवेली तालुक्यातील मांजरी खुर्द येथे दि. १३, तर कोलवडी येथे १५ ऑक्टोबरपासून मोजणी सुरू होणार आहे.

प्रस्तावित इनर रिंग रोडची रुंदी ६५ मीटर असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी नऊ मीटर रुंदीचे सेवा रस्ते (सर्व्हिस रोड) उभारण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पासाठी बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन प्रशासनाकडून मोजणीपूर्व ग्रामबैठका घेतल्या जात आहेत. या बैठकांमध्ये शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करून भूसंपादनाची प्रक्रिया, मोबदल्याचे मूल्यांकन आणि त्यासंदर्भातील कार्यपद्धती यांची माहिती दिली जात आहे. संवादातून शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करण्यावर प्रशासनाचा भर आहे.

मुळशी तालुक्यातील हिंजवडी, जांबे, मारुंजी आणि नांदे या चार गावांतील ग्रामस्थांनी जमीन मोजणीस सहमती दर्शवली आहे. त्यानुसार हिंजवडी येथे १२ ऑक्टोबर, जांबे येथे १३ ऑक्टोबर, मारुंजी येथे १५ ऑक्टोबर, तर नांदे येथे १७ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रत्यक्ष जमीन मोजणी करण्यात येणार आहे. नेरे आणि माण या गावांतील ग्रामस्थांशीही प्रशासनाचा संवाद सुरू असून, त्यांच्या स्थानिक मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच, हवेली तालुक्यातील मांजरी खुर्द येथे १३ ऑक्टोबरपासून जमिनींची संयुक्त मोजणी सुरू होणार आहे.

हवेली तालुक्यातील कोलवडी येथे ग्रामपंचायतीच्या सभागृहात झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी जमीन मोजणीस सहमती दर्शवली. या बैठकीत भूसंपादन उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या मागण्या आणि अडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर १५ ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष जमीन मोजणी सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

 


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.