आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

लाइफ रिपब्लिक, मारुंजी येथे ९४ वा भारतीय वायुसेना दिन उत्साहात साजरा

नितीन देशपांडे   70   09-10-2026 14:27:32

लाइफ रिपब्लिक, मारुंजी येथे ९४ वा भारतीय वायुसेना दिन उत्साहात साजरा

सैनिकांचे योगदान कधीही विसरता येणार नाही; शिवाजीराव बुचडे पाटील यांचे प्रतिपादन

मारुंजी : भारतीय भूतपूर्व सैनिक संघटना (IESL), मावळ-मुळशी तालुका, पुणे यांच्या वतीने लाइफ रिपब्लिक, मारुंजी येथे ९४ वा भारतीय वायुसेना दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शहीद जवानांना पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. देशाच्या संरक्षणासाठी आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या सैनिकांच्या शौर्याचा, त्यागाचा आणि योगदानाचा गौरव यावेळी करण्यात आला.

 

कार्यक्रमाला उपस्थित असलेले पुणे जिल्हा परिषद सदस्य तथा भारतीय जनता पार्टीचे गटनेते शिवाजीराव बुचडे पाटील यांनी सैनिकांच्या योगदानाविषयी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, “देशसेवेसाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या सैनिकांचे योगदान कधीही विसरता येणार नाही. सैनिक आपले घरदार आणि परिवार सोडून देशाच्या सीमेवर अहोरात्र कर्तव्य बजावत असतात. त्यांच्या त्यागामुळेच आपण सुरक्षित जीवन जगू शकतो. त्यामुळे सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती समाजाने नेहमीच आदर आणि कृतज्ञतेची भावना जपली पाहिजे.”

 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे सचिव लेफ्टनंट अमर सिंह यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे अध्यक्ष तथा कारगिल युद्धातील माजी सैनिक रामदास मदने यांनी सूत्रसंचालन केले. प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय भूतपूर्व सैनिक संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष सुभेदार मेजर यशवंत महाडिक उपस्थित होते.

 

यावेळी पुनवळे गावचे युवा कार्यकर्ते जालिंदर काटे यांच्यासह परिसरातील वायुसैनिक, माजी सैनिक, वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी आणि सैनिक परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

कार्यक्रमादरम्यान भारतीय वायुसेनेच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. माजी सैनिक आणि सैनिक परिवारातील कलाकारांनी गीतगायन, भाषणे तसेच विविध कलाविष्कार सादर केले. वायुसैनिकांनी आपल्या सेवाकाळातील महत्त्वपूर्ण अनुभव कथन करून उपस्थितांना प्रेरित केले. तसेच उपस्थित मान्यवरांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला.

संस्थेचे उपाध्यक्ष सुनील रणदिवे यांनी आभार प्रदर्शन केले. 'वंदे मातरम्' या राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. सैनिकांच्या शौर्याचा, त्यागाचा आणि राष्ट्रसेवेचा गौरव करणारा हा कार्यक्रम देशभक्तीपूर्ण वातावरणात पार पडला.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.