आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

UIDAI चे ५ नवीन नियम लागू; 'ही' कागदपत्रे आता अनिवार्य!

नितीन देशपांडे   168   06-10-2026 11:28:14

Pune 

आधार कार्डावरील नावात काही चूक आहे का किंवा लग्नानंतर नाव बदलायचे आहे? तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) आधार कार्डावरील नाव दुरुस्ती

आणि बदलाच्या नियमांत मोठे बदल केले आहेत.

यासंदर्भात UIDAI ने एक नवीन प्रमाण कार्यपद्धती (SOP) जारी केली आहे.

नवीन नियमांनुसार, नावात किरकोळ सुधारणा करणे, चुका दुरुस्त करणे, लग्नानंतर किंवा घटस्फोटानंतर नाव बदलणे आणि पूर्ण नाव बदलणे या सर्वांसाठी आता वेगवेगळ्या कागदपत्रांची आवश्यकता असेल. याशिवाय, सादर केलेले शपथपत्र, गॅझेट नोटिफिकेशन आणि ओळखीचे पुरावे यांची कडक तपासणी झाल्यानंतरच अर्जावर प्रक्रिया केली जाईल. ‘इंडिया टूडे’ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

आधार कार्डधारकांनी नाव बदलण्यापूर्वी जाणून घेतले पाहिजेत ‘हे’ ५ महत्त्वाचे नियम:

१. नावात किरकोळ बदल? वैध पुरावा पुरेसा

एखाद्या व्यक्तीच्या ओळखीमध्ये बदल न होता नावात किरकोळ दुरुस्ती करायची असल्यास, त्याला ‘मायनर नेम चेंज’ (Minor Name Change) मानले जाईल.

  • यात कशाचा समावेश होतो? नावाचे स्पेलिंग दुरुस्त करणे, आद्याक्षरांचा विस्तार करणे, मधले नाव किंवा आडनाव जोडणे अथवा काढणे, किंवा नावाचा क्रम बदलणे.
  • आवश्यक कागदपत्रे: यासाठी लागू असणारा ओळखीचा पुरावा द्यावा लागेल. १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी कुटुंबाच्या प्रमुखाच्या आधारे नाव अपडेट करताना नातेसंबंधाचा पुरावावापरता येईल.
    (उदा. ‘Ram’ ऐवजी ‘Rama’ करणे किंवा ‘Somya’ ऐवजी ‘Saumya’ करणे)

२. डेटा एंट्रीच्या चुकीसाठी प्रतिज्ञापत्र अनिवार्य

आधार काढताना किंवा अपडेट करताना ऑपरेटरच्या चुकीमुळे नाव चुकीचे नोंदवले गेले असल्यास प्रक्रिया वेगळी असेल:

  • प्रौढांसाठी: ॲनेक्चर-बी (Annexure B) मधील शपथपत्र आणि ओळखीचा (PoI) किंवा नातेसंबंधाचा (PoR) पुरावा सादर करावा लागेल.
  • अल्पवयीनांसाठी: पालकांना ॲनेक्चर-सी (Annexure C) मधील शपथपत्रासह आवश्यक पुरावे द्यावे लागतील.
  • महत्त्वाची अट: तुम्ही दुरुस्त करू इच्छिणारे नाव, पूर्वी UIDAI कडे जमा केलेल्या कागदपत्रांमधील नावाशी तंतोतंत जुळणारे असावे. तसे नसल्यास अर्ज फेटाळला जाऊ शकतो.

३. विवाह किंवा घटस्फोटानंतर आडनाव बदलण्यासाठी वेगळे नियम

विवाह किंवा घटस्फोटानंतर आधार कार्डावरील आडनाव बदलू इच्छिणाऱ्या महिलांसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे:

  • महिलांना परिशिष्ट-डी मधील शपथपत्रासोबत ओळखीचा पुरावा द्यावा लागेल. या शपथपत्रामध्ये, नाव किंवा आडनाव बदलाचा उद्देश केवळ विवाह किंवा घटस्फोटाशी संबंधित आहे आणि यामुळे मूळ ओळख बदलत नाही, याचे स्पष्टीकरण असणे आवश्यक आहे.
  • याशिवाय, नोंदणीकृत विवाह प्रमाणपत्रदेखील वैध पुरावा म्हणून मान्य केले जाईल.
  • लिंग बदलीनंतर नाव बदलण्यासाठी लागू असणारा ओळखीचा पुरावा सादर करावा लागेल.

४. काही बदलांसाठी कोणत्याही कागदपत्राची गरज नाही!

UIDAI ने अशाही काही परिस्थिती स्पष्ट केल्या आहेत जिथे कोणत्याही पुराव्याची किंवा कागदपत्राची गरज भासणार नाही:

  • कॅपिटल अक्षरांमधील त्रुटी (उदा. ‘RaMesh’ ऐवजी ‘Ramesh’ करणे).
  • नावातून पूर्णविराम (Dot) हटवणे.

‘उर्फ’ किंवा ‘ॲलियस’ बाबतचे नियम:

नावात ‘उर्फ’ किंवा ‘Alias’ समाविष्ट असलेल्या प्रकरणात, प्रौढांना परिशिष्ट-ई आणि अल्पवयीन मुलांसाठी परिशिष्ट-एफ शपथपत्रासह पुरावा द्यावा लागेल. सामान्यतः आधार कार्डवर कोणतीही पदवी, लष्करी रँक किंवा उपनाव नोंदवण्यास बंदी आहे.

५. पूर्ण नाव बदलायचे असल्यास ‘गॅझेट नोटिफिकेशन’ अनिवार्य!

नावात संपूर्ण बदल किंवा ज्यामुळे व्यक्तीची ओळखच बदलते, असा बदल ‘मेजर नेम चेंज’ (Major Name Change) च्या श्रेणीत येतो.

  • अशा प्रकरणात शासकीय राजपत्र अधिसूचना अनिवार्य असेल. त्याशिवाय नाव बदलता येणार नाही.
  • UIDAI कडून नवीन नावाची पडताळणी जुन्या नोंदींशी केली जाईल. तसेच सादर केलेले गॅझेट, शपथपत्र आणि ओळखीच्या पुराव्यांची सत्यता तपासल्यानंतरच नाव अपडेट केले जाईल.

टीप: हे सर्व नवीन नियम १८ सप्टेंबर २०२६ पासून देशभरात लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे आधार केंद्रावर जाण्यापूर्वी आपल्या गरजेनुसार योग्य कागदपत्रे सोबत ठेवणे आवश्यक आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.