आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा! पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे; १५० कॉल्स अन् गोव्याच्या प्लॅनचा उलगडा

नितीन देशपांडे   161   06-10-2026 11:24:54

शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्याकांडाच्या तपासात पोलिस यंत्रणेला अतिशय धक्कादायक आणि महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. मुख्य सूत्रधार सुभाष उर्फ पप्या शिंदे असल्याचे तपासात समोर आले आहे.

आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचा दावा करणारा पप्या शिंदे आता या प्रकरणात पुरता अडकला आहे.

प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी सोमवारी कोर्टात हजर केले होते. त्यानंतर सुनावणीत आणखी महत्त्वाची माहिती पोलिसांनी कोर्टाला दिली. पप्या शिंदे हाच पूर्णेकर प्रकरणातील महत्त्वाचा दुवा असल्याचे समोर आले आहे. पूर्णेकरांवर त्यांच्याच कार्यालयात गोळ्या झाडण्यात आल्या तेव्हा पप्या हा तिकडेच होता. पूर्णेकरांना रुग्णालयातही नेताना पप्या होत्या. पूर्णेकरांच्या मारेकऱ्यांविरोधात रुग्णालयात शिवीगाळ केली होती. मात्र, पोलिसांना संशय आल्याने त्यांनी पप्या शिंदेला अटक केली. आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे पप्याने आईसोबत बोलताना सांगितले होते. मात्र, पोलिसांनी पुरावे दिल्याने पप्या शिंदेच्या अडचणीत वाढ झाली आहे.

२९ सप्टेंबर रोजी प्रदीप पूर्णकर यांच्या कार्यालयात पप्या शिंदे स्वतः हजर होता. पूर्णकर बेसावध असल्याचे पाहून त्यानेच बाहेर असलेल्या मारेकऱ्यांना इशारा केला. इशारा मिळताच मारेकऱ्यांनी कार्यालयात घुसून पूर्णकर यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. प्रदीप पूर्णेकर यांच्यावर ६-७ गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतरही प्रदीप पूर्णेकर हे संपल्याची खात्री करण्यासाठी मारेकऱ्यांनी त्यांच्यावर कोयत्याने प्राणघातक वार केले.

पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या हत्येचा कट तब्बल महिनाभरापूर्वीच शिजला होता. या काळात पप्या शिंदे आरोपींशी सातत्याने संपर्कात होता, अशी माहिती पोलिसांनी कोर्टाला दिली. त्याने त्यांच्याशी जवळपास १५० वेळा फोनवरून संवाद साधला. विशेष म्हणजे, पप्या शिंदे दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावर असलेल्या सीम कार्डचा वापर करत होता. हत्येच्या कटाचे संपूर्ण प्लॅनिंग पप्प्यानेच केले असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पूर्णेकरांच्या मारेकऱ्यांना घटनास्थळावर आणण्यासाठी आणि हत्या केल्यानंतर गोव्याला पळून जाण्यासाठी पप्प्याने एका ऑल्टो कारची आणि तीन दुचाकींची व्यवस्था केली होती. त्याचा साथीदार संतोष कनोजिया उर्फ टल्ली यानेदेखील एका दुचाकीची व्यवस्था करून दिली होती. ही हत्या सुपारी देऊन घडवून आणल्याचा दाट संशय पोलिसांनी न्यायालयात व्यक्त केला आहे. गुन्ह्यात वापरलेली हत्यारे टल्लीकडे असल्याचे पप्या सांगत असला, तरी पोलिस त्याची सखोल चौकशी करत आहेत. पूर्णकरांच्या हत्येची सुपारी कोणी दिली आणि त्यामागील मुख्य सूत्रधार कोण, याचा शोध आता पोलिस घेत आहेत.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.