बोंगाळे कुटुंबीयांचा दुःखातही माणुसकीचा आदर्श निर्णय
निपाणी : मित्राला भेटण्यासाठी जात असताना पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर यमगर्णी गावाजवळ दुचाकी घसरून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या निखील नितीन बोंगाळे (वय ३४, रा. बिरोबा माळ, लेटेक्स कॉलनी, निपाणी) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातानंतर त्यांना निपाणी येथील महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, प्रकृतीने साथ न दिल्याने अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
रविवारी (ता. २७) रात्री निखील हे यमगर्णी येथील मित्राला भेटण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. मात्र, बराच वेळ होऊनही ते घरी परतले नाहीत. मध्यरात्रीच्या सुमारास यमगर्णीजवळ त्यांची दुचाकी घसरून गंभीर अपघात झाल्याची माहिती नातेवाईकांना मिळाली. स्थानिक नागरिक, वाहनधारक आणि पोलिसांनी त्यांना तातडीने निपाणी येथील महात्मा गांधी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी कोल्हापूरला हलविण्यात आले होते.
निखील यांच्या निधनाने बोंगाळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र, या दुःखाच्या प्रसंगीही कुटुंबीयांनी धैर्य दाखवत निखील यांचे अवयवदान करण्याचा सामाजिक आणि हृदयस्पर्शी निर्णय घेतला. त्यांच्या अवयवदानामुळे पाच गरजू रुग्णांना जीवनदान मिळाले असून, बोंगाळे कुटुंबीयांनी दुःखातही माणुसकीचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.
निखील बोंगाळे यांचे मूळ गाव बेळगाव असून, बोंगाळे कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून निपाणी येथे वास्तव्यास आहेत. निखील हे एका खासगी कंपनीत मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत होते. अत्यंत हुशार, मनमिळाऊ आणि कुटुंबाशी प्रामाणिक असलेल्या निखील यांचा नातेवाईक व मित्रपरिवाराच्या सुख-दुःखात नेहमीच सहभाग असायचा. त्यांच्या निधनामुळे कुटुंबीयांसह नातेवाईक आणि मित्रपरिवाराने आधार गमावला असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.