आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

हिंजवडीच्या दत्तात्रय जाधवांची ‘पॉवरलिफ्टिंग’मध्ये सुवर्णभरारी; भारताचा तिरंगा सातासमुद्रापार

नितीन देशपांडे   83   01-10-2026 15:20:22

हिंजवडी (ता. मुळशी) : तुर्कस्तानमधील इस्तंबूल येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘२०२६ एशियन क्लासिक आणि इक्विप्ड बेंच प्रेस चॅम्पियनशिप’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत हिंजवडी (ता. मुळशी) येथील दत्तात्रय जाधव यांनी ऐतिहासिक कामगिरी करत भारतासह मुळशी तालुक्याचे नाव सातासमुद्रापार उज्ज्वल केले आहे.

वयाच्या ५३व्या वर्षीही जाधव यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी करत ‘मास्टर-२’ व ६६ किलो वजनी गटात तब्बल २०५ किलो वजन उचलत उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेत त्यांनी क्लासिक प्रकारात सुवर्णपदक (Gold) तर इक्विप्ड प्रकारात रौप्यपदक (Silver) पटकावले.

२५ सप्टेंबर रोजी इस्तंबूल येथे झालेल्या या स्पर्धेत १२ देशांतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यांच्यातून जाधव यांनी आपल्या ताकदीच्या जोरावर ही उल्लेखनीय कामगिरी नोंदवली. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या स्पर्धेतही त्यांनी चौथा क्रमांक मिळवला होता.

दत्तात्रय जाधव यांची ही कामगिरी केवळ पदकापुरती मर्यादित नसून, वयाची मर्यादा न मानता फिटनेस, सातत्य आणि मेहनतीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवता येते, हा संदेश देणारी आहे. त्यांच्या यशामुळे तरुण पिढीलाही व्यायाम, फिटनेस आणि आरोग्यदायी जीवनशैलीची प्रेरणा मिळत आहे.

हिंजवडीच्या या सुपुत्राने आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेल्या या यशाबद्दल मुळशी तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.