Pune
MPSC Mains Paper 2026 Postponed: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ३ ऑक्टोबर २०२६ पासून आयोजित केलेल्या विविध मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्धीपत्रक काढून याबाबत माहिती दिली आहे.
अनेक विद्यार्थी संघटना/विद्यार्थी यांनी आयोगाकडे राज्य सेवा मुख्य परीक्षा -२०२५ मधील मुल्यांकनाबाबत आक्षेप नोंदविलेले आहेत. सदर आक्षेप विचारात घेऊन राज्य सेवा मुख्य परीक्षा - २०२५ च्या उत्तरपत्रिकांचे पुर्नमुल्यांकन करण्याचा निर्णय आयोगाने घेतलेला आहे. त्यामुळे सदर परीक्षेची प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे, असे आयोगाने म्हटले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, राज्यातील प्रचलित सर्व परीक्षा पद्धतींचा आढावा घेण्यासाठी राज्य शासनाने गठित केलेल्या उच्चस्तरीय समितीने राज्यभरातील अनेक परीक्षार्थी व इतर संबंधितांशी विस्तृत चर्चा करून तसेच उत्तम कार्यपद्धतींचा अभ्यास करून आदर्श परीक्षा पद्धतीबाबत शिफारशी लवकरच अपेक्षित आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थी, पालक, विद्यार्थी संघटना तसेच काही सन्माननीय लोकप्रतिनिधी यांनी दिनांक ३ ऑक्टोबर, २०२६ पासून सुरू होणारी राज्य सेवा मुख्य परीक्षा-२०२६ पुढे ढकलण्यात यावी, अशा आशयाची निवेदने आयोगास प्राप्त झालेली आहेत.
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ पुढे ढकलली
वरील सर्व बाबींचा आयोगाने साकल्याने विचार करून, दिनांक ३ ऑक्टोबर, २०२६ पासून घेण्यात येणारी राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२६, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा-२०२६ आणि महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा-२०२६ या स्पर्धा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षेच्या सुधारित दिनांकाबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. याची संबंधित उमेदवारांनी कृपया नोंद घ्यावी, असे MPSC ने म्हटले आहे.
दरम्यान, या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असल्या तरी आयोगाने नव्या परीक्षेची तारीख जाहीर केलेली नाही. दुसरीकडे, महाराष्ट्रभरातल्या युवकांची जी मागणी आम्ही राज्यपाल महोदयांसमोर ठेवली होती, ती मान्य करुन राज्य सेवा आयोगाची परिक्षा पुढे ढकलल्याबद्दल राज्यपाल महोदयांचे आभार! आता ह्याच निर्णयाप्रमाणे राज्य सेवा आयोगाच्या प्रमुखांचा राजीनामाही तत्काळ घेतला जाईल अशी आशा करतो, असे उद्धवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.