Pune
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरातील नामदेव पायरीचे दर्शन घेत त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला.
यावेळी पंढरपूर तालुक्यातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Teachers MLC Election)
दत्तात्रय सावंत हे पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून यापूर्वी आमदार राहिले आहेत. त्यांच्या अधिकृत संकेतस्थळानुसार, जुलै २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत ते या मतदारसंघातून विजयी झाले होते. पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर हे या मतदारसंघातील जिल्हे आहेत. (Teachers MLC Election)
भाजपच्या उमेदवारीबाबत अद्याप निर्णय नाही
सावंत यांच्या नावाची भाजपकडून चर्चा सुरू असली तरी त्यांची उमेदवारी अद्याप निश्चित झालेली नाही. यापूर्वी सावंत यांनी आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढणार नसल्याचे सांगत भाजप तसेच महाविकास आघाडी या दोन्ही पर्यायांचे दरवाजे खुले असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे आगामी काळात ते कोणत्या पक्षाच्या किंवा आघाडीच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवतात, याकडे लक्ष लागले आहे. (Teachers MLC Election)
दरम्यान, पुणे शिक्षक मतदारसंघासाठी भाजप आणि महायुतीमध्ये उमेदवारीवर चर्चा सुरू आहे. मंगेश चिवटे, सचिन सानप, कौस्तुभ गावडे यांच्यासह दत्तात्रय सावंत यांची नावे इच्छुकांमध्ये चर्चेत आहेत. विद्यमान आमदार जयंत आसगावकर हे देखील पुन्हा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे वृत्त आहे. (Teachers MLC Election)
२३ ऑक्टोबरला मतदान
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. २९ सप्टेंबरला अधिसूचना प्रसिद्ध होणार असून ६ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. ७ ऑक्टोबरला अर्जांची छाननी, तर ९ ऑक्टोबरला अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. (Teachers MLC Election)