Pune
पोलीस दलातील पोलीस हवालदार दत्तात्रय तेलंगे (वय ५०) यांचे शुक्रवारी (२५ सप्टेंबर) पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनामुळे पुणे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत असून सहकाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
दत्तात्रय तेलंगे हे वानवडी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. सध्या ते पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात प्रतिनियुक्तीवर कार्यरत होते. गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे काम आटोपून ते घरी गेले होते.
गप्पा मारत असताना चक्कर येऊन कोसळले
दरम्यान, शुक्रवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास हडपसर येथील निवासस्थानाजवळ गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांशी ते गप्पा मारत होते. याचवेळी त्यांना अचानक चक्कर आली आणि ते खाली कोसळले.
घटनेनंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी तातडीने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
गणेशोत्सवाच्या काळात कर्तव्य बजावत असतानाच पोलिस दलातील एका सहकाऱ्याच्या झालेल्या या आकस्मिक निधनाने पुणे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.