आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला ‘ब्रेक’; उद्घाटनाची तारीख पुन्हा पुढे

नितीन देशपांडे   389   24-09-2026 11:22:16

PUNE 

हिंजवडी ते शिवाजीनगर या महत्त्वाच्या मेट्रो मार्गिकेच्या प्रवासी सेवेला पुन्हा विलंब झाला आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्याने उद्घाटनाचा कार्यक्रम पुढे ढकलला गेला आहे.

त्यामुळे हिंजवडी, बाणेर, बालेवाडी, औंध आणि शिवाजीनगर परिसरातील प्रवाशांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) माध्यमातून हा 23.2 किलोमीटरचा उन्नत मेट्रो मार्ग विकसित करण्यात आला आहे. या मार्गावर एकूण 23 स्थानके आहेत. हिंजवडीतील आयटी परिसराला पुणे शहराच्या मध्यवर्ती भागाशी जोडणे हा या प्रकल्पाचा महत्त्वाचा उद्देश आहे.

या मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यातील 12 स्थानकांना जुलैमध्ये कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टी (CMRS) कडून प्रवासी सेवा सुरू करण्यासाठी प्राथमिक मंजुरी मिळाली होती. या मंजुरीअंतर्गत माण ते आर. के. लक्ष्मण म्युझियम, बालेवाडी हा सुमारे 13 किलोमीटरचा भाग येतो.

यानंतर PMRDA ने सुरुवातीला ठरवलेल्या 12 स्थानकांऐवजी 17 स्थानकांवर सेवा सुरू करण्याची तयारी केली होती. उर्वरित 5 स्थानकांसाठी आवश्यक सुरक्षा मंजुरी आणि इतर प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम सुरू होते. मात्र, आता निवडणूक आचारसंहितेमुळे उद्घाटनाचा निर्णय रखडला आहे.

दरम्यान, निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उद्घाटनाबाबत पुढील निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेट्रो कधी सुरू होणार, याकडे प्रवासी आणि आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.