Pune
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे निघाले असून यांचा रात्रीचा मुक्काम बीडच्या पाटोदा येथे होता. पाटोद्याला पोहण्यासाठी त्यांना खूप उशीर झाला. नियोजित वेळेपेक्षा खूप उशीरा ते पाटोदा येथे आले.
रात्री साधारणत: दीड वाजण्याच्या सुमारास जरांगे पाटील हे पाटोदा येते दाखल झाले. एवढा उशीर होऊन देखील हजारो मराठा समाज बांधव आणि महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होत्या. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले.
मनोज जरांगे पाटील भाषणात काय म्हणाले?
"मी तुमच्या समोर खणखणीत बोलत असतो, पण आता बोलता येत नाही. आपल्यासाठी समाज फार महत्त्वाचा आहे. आपल्यासाठी कोणी नाही हे लक्षात ठेवा... आपला समाज आपल्याला मोठा करायचा आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे. लढायचं शिका... सगळ्यांची लेकरं एसीमध्ये बसली आहेत. मी चांगल्या चांगल्याला जेरीस आणतो... मी घाबरलो नाही... खचलो नाही.." असं मनोज जरांगे भाषणात म्हणाले.
माझा समाज दुसरं सरकार आणू शकतो- जरांगे
भाषण सुरू असताना जनतेतून 'सलाईन घ्या' अशी विनंती करण्यात आली. यावर जरांगे म्हणाले की, माझ्या समाजाच्या लेकरा बाळांसाठी लढताना माझं शरीर थकलं आहे. तुमच्यासाठी मी सरकारला अंगावर घेतलंय. आपण कधीच हतबल होऊ शकत नाही. सरकारला वाटतं मी त्यांना शरण यावं. पण मागणी सोडून देऊ? सरकार पेक्षा माझा बाप मोठा आहे समाज. माझा समाज कोणतंही सरकार पडू शकतो आणि दुसरं सरकार आणू शकतो. मी मरेल पण तुम्हाला मान खाली घालू देणार नाही, असंही जरांगे भाषणात म्हणाले.
आजचा प्रवास फार मोठा झाला. मी समाजाला सांगितलं होतं. तुम्ही माझ्यासोबत येऊ नका. मला एकट्याला जायचं आहे. माझं ऐकायचं असेल तर सांगतो... तुमच्या लेकराशिवाय मी एक घासही खात नाही. गेली चोवीस वर्ष मी हे काम करत आहे. दोन वेळेस मुंबईला गेलो. आज उपोषणाचा अठरावा दिवस आहे. सलाईन घेतलं म्हणून बरं वाटलं पण बारा तारखेला सलाईन सोडलं तेव्हापासून पुन्हा त्रास होत आहे.
मी फडणवीसांना तीन वर्षे हरवलं आहे- मनोज जरांगे
मनोज जरांगे भाषणात पुढे म्हणाले, मी पाटोद्यात कशाला आलोय माहिती आहे का? पाटोद्यासारखे कणखर लोक कुठेही नाहीत. इथे सर्वजण झटणारे आहेत. देवेंद्र फडणवीसांना तोडीस तोड डाव टाकतोय. मी त्याला तीन वर्ष हरवलं आहे. पेन ड्राइव्हमध्ये सगळ्या नोंदी घेतल्या आहेत. उद्या पाटोद्यातून एकही गाडी माझ्या मागे येऊ देऊ नका. मी मार्ग बदलून निघून जातो.. फक्त पोलिसांना सांगतो. मला पुढे जाऊ नाही दिलं तर तुम्ही या... पण तुम्ही माझ्या मागे येणार असाल तर मी पुन्हा आंतरवाली येथे जाईल...