Pune
गणेशोत्सव असो किंवा इतर सार्वजनिक कार्यक्रम, मोठ्या आवाजातील डीजेमुळे होणाऱ्या त्रासावर मर्यादा आणण्याची मागणी होत आहे.
पुण्यात विद्यानंद बापट यांनी हा मुद्दा जोरदारपणे मांडल्यानंतर आता हा विषय राज्यभर चर्चेत आला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनीही डीजेबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.
पुण्यात माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, प्रत्येकाची मतं वेगळी असू शकतात; मात्र त्यासाठी हिंसेचा मार्ग योग्य नाही. सण-उत्सव साजरे करताना पारंपरिक पद्धतीला महत्त्व दिलं, तर त्या उत्सवाचं वेगळेपण टिकून राहतं. मात्र एखादी परंपरा किंवा पद्धत बदलायची असेल, तर लोकांना विश्वासात घेऊन त्यावर मार्ग काढणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितलं की, नुकतंच त्यांचं पुणे पोलीस आयुक्तांशी बोलणं झालं. अनेक मुद्द्यांवर एकमत झालं असून, ज्या गोष्टींमुळे नागरिकांना त्रास होतो, त्याबाबतही आता सर्वांचं लक्ष आहे. डीजेमुळे होणाऱ्या त्रासाविरोधातही मोठ्या प्रमाणात एकमत होत असल्याचं त्यांनी म्हटलं. यंदाचा पुण्यातील गणेशोत्सव सांस्कृतिक पद्धतीने साजरा होईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. लोकसहभागातून डीजेचा प्रभाव कमी करता येईल, असंही त्यांनी सांगितलं.
डीजेबाबत सरकार लगेचच नवीन धोरण आणणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. आधी सर्वांशी चर्चा करून तोडगा काढायचा आणि त्यानंतर धोरण तयार करून त्याचा आदेश काढायचा, अशी भूमिका त्यांनी मांडली. प्रचंड ध्वनीप्रदूषणापासून दूर जाण्याची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं.