ठाकरे शिवसेनेचे माजी पंचायत समिती सदस्य नितीनदादा वाघ यांची मागणी
पुणे : सिंहगड रोड परिसरातील वाढती लोकसंख्या, नवनवीन गृहप्रकल्प आणि प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता या मार्गावर बससेवा अपुरी पडत आहे. त्यामुळे शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य प्रवाशांना गर्दीच्या वेळेत बसमध्ये उभे राहून प्रवास करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळेत खडकवासला येथून शॉर्ट रूट बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी ठाकरे शिवसेनेचे माजी पंचायत समिती सदस्य नितीनदादा वाघ यांनी केली आहे.
सिंहगड रोडवरील सध्याच्या बसेस खानापूर, सिंहगड व पानशेत परिसरातून येताना सकाळच्या वेळेतच पूर्ण क्षमतेने भरलेल्या असतात. तसेच सायंकाळी पुणे शहरातून येणाऱ्या बसेसमध्ये मोठी गर्दी असते. त्यामुळे खडकवासला, कोल्हेवाडी, किरकटवाडी, नांदेड परिसरातील प्रवाशांना वेळेवर बस मिळत नाही. बस मिळाल्यानंतरही अनेकदा उभे राहून प्रवास करावा लागतो.
माणिकबाग परिसरात गर्दीमुळे झालेल्या अपघातात एका मुलीला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही बससेवा वाढविणे अत्यंत गरजेचे असल्याचे नितीनदादा वाघ यांनी सांगितले.
यापूर्वी DIAT येथून शॉर्ट रूटच्या बसेस उपलब्ध असल्याने प्रवाशांची गैरसोय कमी होत होती. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच गर्दीच्या वेळेत खडकवासला येथून पुणे शहराच्या दिशेने शॉर्ट रूट बसेस सुरू करून त्यांची वारंवारता वाढवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी गोकुळ करंजावणे, संतोष गोपाळ, तानाजी गाढवे, अजय मते, अक्षय सावंत, सौरभ मोकाशी, आकाश पायगुडे आदी उपस्थित होते.
प्रवाशांची गैरसोय आणि सुरक्षितता लक्षात घेऊन पीएमपी प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घ्यावी, अशी अपेक्षा नितीनदादा वाघ यांनी व्यक्त केली.