आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

Maratha Reservation: जरांगेंची मागणी झिडकारली, ''शिंदेंची सभा होणारच!" खासदार बंडू जाधवांचे थेट आव्हान; मराठवाड्यात हायव्होल्टेज ड्रामा!

नितीन देशपांडे   544   30-08-2026 12:55:06

Pune 

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आणि कुणबी जात प्रमाणपत्रावरून अंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे परभणीचे खासदार संजय (बंडू) जाधव यांच्यात थेट राजकीय संघर्ष पेटला आहे.

जरांगे पाटील यांनी परभणीतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा तातडीने रद्द करण्याचा इशारा फोनवरून दिला होता. मात्र, खासदार बंडू जाधव यांनी जरांगेंची ही मागणी फेटाळून लावत "सभा नियोजित वेळेनुसार होणारच," अशी ठाम भूमिका घेतली आहे. तर, दुसरीकडे जरांगे पाटील यांनी बंडू जाधवांचा 'कार्यक्रम' करणार असल्याचा इशारा दिला आहे.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी परभणीत शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्याला विरोध दर्शवला. हा मेळावा रद्द करण्याची मागणी जरांगे यांनी खासदार संजय जाधव यांच्याकडे केली होती. मात्र, खासदार जाधव यांनी ही मागणी फेटाळून लावत मेळावा होणारच असल्याचे म्हटले आहे. हा मेळावा झाल्यास आपण परभणीत येऊ, असे खुलं आव्हान जरांगे यांनी खासदार संजय जाधव यांना दिले होते. मात्र, आता शिवसेना शिदे गटाने यावर भूमिका व्यक्त केली आहे.

अंतरवाली सराटी येथे उपोषणाचा दुसरा दिवस असताना मनोज जरांगे पाटील यांनी परभणीतील शिवसेनेच्या मेळाव्यावर तीव्र आक्षेप घेतला. "मराठ्यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द करायचे आणि मराठ्यांच्याच उरावर नाचायचे? हा कार्यक्रम तातडीने रद्द करा, नाहीतर मलाच परभणीत यावे लागेल," असा सणसणीत इशारा जरांगेंनी खासदार बंडू जाधवांना फोन करून दिला होता. जरांगे यांनी बंडू जाधवांवर जोरदार निशाणा साधत महायुती सरकारच्या कारभारावरही ताशेरे ओढले.

खासदार जाधव यांनी काय म्हटले?


जरांगे पाटील यांच्या या खुल्या आव्हानानंतर आणि थेट इशाऱ्यानंतर खासदार बंडू जाधव यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. "मनोज जरांगे पाटील यांना आंदोलक म्हणून बोलण्याचा नैतिक अधिकार नक्कीच आहे. मात्र, सभेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. अशा ऐनवेळी सभा रद्द करणे संयुक्तिक होणार नाही," असे उत्तर आपण स्वतः जरांगेंना दिल्याचे खासदार जाधवांनी सांगितले.

खासदार बंडू जाधव यांनी मोठी चूक केली असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. एकनाथ शिंदे यांनीच हा कार्यक्रम रद्द करायला हवा होता, असे जरांगे यांनी म्हटले. खासदार जाधव आता बावनकुळे-शिरसाट यांच्या टोळीत सामील झाले. शिंदेंचा आणि जाधवांचा कार्यक्रम होणार असल्याचा इशारा जरांगे यांनी दिला. संजय जाधव यांनी मराठ्यांच्या नादी लागू नये असा इशारा जरांगे यांनी दिला. परभणीतील कार्यकर्त्यांनी आपली ऊर्जा मुंबईसाठी राखून ठेवावी असेही पाटील म्हणाले.

दरम्यान, खासदार बंडू जाधव यांच्या भूमिकेनंतर मराठा आंदोलक आक्रमक होण्याची शक्यता आहे. हीच शक्यता लक्षात घेता परभणीत पोलिसांनी आपल्या बंदोबस्तात वाढ केली आहे. खासदार जाधव यांचे निवासस्थान, परभणीतील शिंदे गटाच्या मेळाव्याच्या स्थान आदी ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. त्याशिवाय, नांदेड विमानतळावरील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.