आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

शिल्पा गवारे यांची हत्याच झाली? मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण,

शरद लाटे  60   28-08-2026 09:02:52

Pune 

वाकड परिसरात एका बड्या घरातील विवाहितेनं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली. माहेरहून पैसे आणण्यासाठी आणि वडिलांच्या मालमत्तेत हिस्सा मिळवण्यासाठी सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून ४२ वर्षीय विवाहित महिलेने गळफास घेऊन जीवन संपवलं होतं.

घटना गुरुवारी (२७ ऑगस्ट) मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास वाकड येथील ईशान सोसायटीमधील 'प्रथम' बंगल्यात उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण पिंपरी-चिंचवड परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

आता या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. विवाहितेनं आत्महत्या केली नसून तिच्यासोबत घातपात घडला असावा, अशी शंका व्यक्त केली जात आहे. विवाहितेनं ज्या बेडरुममध्ये टोकाचं पाऊल उचललं, त्या बेडरुमबाबत धक्कादायक खुलासा आता समोर आला आहे.

पतीसह सासरच्या चार जणांवर गुन्हा


शिल्पा सचिन गवारे (वय ४२, रा. ईशान सोसायटी, वाकड) असं मृत पावलेल्या विवाहितेचं नाव आहे. याप्रकरणी तिचे भाऊ संतोष गुलाब कलाटे (वय ४७, रा. दत्तमंदिर रोड, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मृत महिलेचा पती सचिन उत्तम गवारे, सासरा उत्तम शिवराम गवारे, सासू संजीवनी उत्तम गवारे आणि दीर संदीप उत्तम गवारे या सर्वांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे व छळवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

माहेरच्या संपत्तीवर डोळा अन् अमानुष मारहाण


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिल्पा यांचा विवाह २००९ मध्ये सचिन गवारे याच्याशी झाला होता. विवाहाच्या वेळी सासरच्या मंडळींनी सचिनवर पूर्वी एका खुनाचा गुन्हा दाखल असून खटला सुरू असल्याची माहिती लपवून ठेवली होती. लग्नानंतर या गुन्ह्यात त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊन तो चार वर्षे तुरुंगातही राहिला होता.

सुरुवातीचे काही दिवस व्यवस्थित गेल्यानंतर सासरच्या मंडळींनी शिल्पा यांच्याकडे माहेरहून पैसे आणण्याचा तगादा सुरू केला. पती सचिन दारूच्या व्यसनाधीन असल्याने तो सतत तिला बेदम मारहाण करत असे, तर सासू संजीवनी चारित्र्यावर संशय घेऊन तिचे कान भरत होती. शिल्पाच्या भावाने बहिणीचा संसार टिकावा म्हणून वेळोवेळी सासरच्या लोकांना रोख रक्कम दिली, तसेच व्यवसाय आणि प्लॉट खरेदीतही आर्थिक मदत केली. मात्र, काही दिवसांपूर्वी शिल्पा यांनी माहेरच्या मालमत्तेच्या कागदपत्रांवर भावांच्या बाजूने सह्या केल्याचे समजताच सासरच्यांचा संताप अनावर झाला. "तुझ्या बापाच्या मालमत्तेत हिस्सा घे," अशी धमकी देत त्यांचा छळ आणखी तीव्र करण्यात आला.

मृत्यूबाबत गूढ वाढले; बेडरूमचा दरवाजा उघडा कसा?


गुरूवारी मध्यरात्री सासरच्या लोकांनी शिल्पा यांनी बेडरूममधील सिलिंग फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे माहेरच्यांना सांगितले आणि त्यांना खाजगी रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. परंतु, बेडरूमचा दरवाजा उघडा ठेवून गळफास कसा घेतला जाऊ शकतो? असा सवाल उपस्थित करत माहेरच्यांनी या मृत्यूबाबत तीव्र संशय व्यक्त केला आहे. ही आत्महत्या नसून सासरच्यांनीच तिची हत्या केली असावी असा गंभीर आरोप करत सखोल चौकशीची मागणी केली आहे. याप्रकरणी वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.