आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

Pune Crime : 'बापाच्या प्रॉपर्टीत हिस्सा माग'चा तगादा; वाकडमध्ये विवाहितेची आत्महत्या;

शरद लाटे  358   27-08-2026 20:50:46

वाकड परिसरात ३२ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिल्पा सचिन गवारे असे मृत विवाहितेचे नाव आहे. सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या कथित छळाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या माहेरच्या कुटुंबीयांनी केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहीण शिल्पा हिचा विवाह सन २००९ मध्ये सचिन गवारे याच्याशी झाला होता. लग्नाच्या वेळी सासरच्या लोकांनी सचिन याच्यावर पूर्ववैमनस्यातून झालेल्या एका खून प्रकरणात केस सुरू असल्याचे लपवून ठेवले होते. लग्नानंतर सचिनला या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आणि तो सुमारे चार वर्षे कारागृहात होता. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस व्यवस्थित गेल्यानंतर सासरच्या मंडळींनी शिल्पा हिच्याकडे माहेरहून पैसे आणण्यासाठी आणि तिच्या वडिलांच्या जमिनीच्या मालमत्तेत हिस्सा मिळवण्यासाठी तगादा लावण्यास सुरुवात केली. पती सचिन याला दारूचे व्यसन होते, तर सासू संजीवनी ही चारित्र्यावर संशय घेऊन सचिनचे कान भरत असे, ज्यावरून सचिन तिला बेदम मारहाण करत असे. “तुझ्या बापाच्या मालमत्तेच्या कागदपत्रांवर सह्या करू नकोस आणि आम्हाला मालमत्तेत हिस्सा दे,” अशी धमकी देऊन तिचा सतत मानसिक व शारीरिक छळ केला जात होता.

 

बहिणीचा संसार टिकवण्यासाठी फिर्यादी संतोष कलाटे यांनी वेळोवेळी सासरच्या लोकांच्या मागण्या पूर्ण करत त्यांना रोख रक्कम दिली, तसेच व्यवसायात व प्लॉट खरेदीतही आर्थिक मदत केली. मात्र, काही दिवसांपूर्वी शिल्पा हिने तिच्या भावांना मालमत्तेच्या कागदपत्रांवर सह्या दिल्याचे समजताच सासरच्यांनी तिला पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली. गुरुवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास शिल्पा हिने बेडरूममधील सिलिंग फॅनला साडीच्या साहाय्याने गळफास घेतल्याची माहिती सासरच्यांनी तिच्या माहेरी दिली. तिला खाजगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले. दरम्यान, बेडरूमचा दरवाजा उघडा ठेवून गळफास घेतल्याचे आरोपी सांगत असल्याने, तिच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करत पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणीही फिर्यादी यांनी केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.