Pune
म्हाळुंगे येथे अपघात झाला. त्या ठिकाणचा रस्ता समपातळीत नसल्याने रस्त्याच्या कडेने गाळ, माती जमा झाली आहे. भूसंपादनाच्या वादातून जागामालकांनी रस्त्याची एक बाजू बंद केली आहे.
त्यामुळे एकाच बाजूने दुहेरी वाहतूक सुरू आहे. त्यातच तेथे चेंबरसाठी खड्डा खोदला असून, दगड टाकले आहेत. हे काम महापालिकेचे नाही, पण ज्या शासकीय संस्थेकडून काम सुरू होते तेथील अभियंते आणि ठेकेदारांनी अपघातानंतर पळ काढला आहे. महापालिकेने जबाबदारी घेऊन काम सुरू केले, मात्र नागरिकांच्या रोषालाही सामोरे जावे लागत आहे, अशी गंभीर परिस्थिती आहे.
वडिलांसोबत दुचाकीवरून जात असताना खड्ड्यामुळे गाडी घसरली आणि त्या अपघातात विराज पाटोळे या ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली असून, पुणे शहरातील खड्ड्यांच्या समस्येवरून नागरिकांनी महापालिकेवर टीकेची झोड उठवली आहे. या घटनेनंतर म्हाळुंगेतील नागरिकांनी मेणबत्ती मोर्चा काढून रस्त्याच्या कामावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
सुमारे २० दिवसांपूर्वी म्हाळुंगे गावातील नागरिकांनी खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन सुरू केले होते. त्यानंतर पथ विभागाने खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले. जेथे अपघात झाला तेथेही पॅचवर्क केले जात आहे. पण अवजड वाहनांची वाहतूक आणि पाऊस यामुळे ही रस्त्यांची दुरुस्ती तात्पुरती मलमपट्टी ठरत आहे. जेथे खड्डे बुजवले, पॅचवर्क केले तेथील खडी निघत आहे. त्यामुळे येथे वारंवार खड्डे बुजविण्याची कामे महापालिकेला करावी लागणार आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
रस्त्याची एकच बाजू सुरू
या सोसायट्यांच्या समोर सुमारे २४ मीटर रुंदीचा मोठा रस्ता आहे. एका जागामालकाने मोबदला दिल्याशिवाय रस्ता ताब्यात देणार नाही, अशी भूमिका घेतल्याने रस्त्याची एक बाजू बंद आहे. येथे डोंगरावरून वाहत येणारा चिखल, लेबर कॅम्पमधील मैलापाणी थेट रस्त्यावर येत आहे. हा वाद सोडविण्यासाठी गेल्या पाच वर्षांत पीएमआरडीएने प्रयत्न केले नाहीत. आता याचा चेंडू महापालिकेच्या कोर्टात आला आहे. दरम्यान, वादातील जागा सोडून उर्वरित रस्ता सुरू करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.
जागामालकास दंड
अपघातानंतर औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयानेही कारवाईला सुरुवात केली आहे. लेबर कॅम्पमधील घाण पाणी रस्त्यावर सोडणाऱ्या जागामालकाला एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, पुढील दोन दिवसांत सांडपाणी वाहून जाण्याची व्यवस्था करावी, अशी नोटीस दिली आहे. त्याचप्रमाणे या परिसरात अनधिकृत पत्राशेड मारून व्यवसाय करणाऱ्यांनाही नोटीस बजावली आहे. २४ तासांत अनधिकृत शेड न काढल्यास कारवाई केली जाईल, असे सांगितले असल्याचे उपायुक्त अविनाश सकपाळ यांनी सांगितले.
कामांबाबत स्पष्टता येणे आवश्यक
म्हाळुंगे गावासह अन्य समाविष्ट गावांत कधी कोणत्या शासकीय विभागाने रस्ते किंवा अन्य कामे केली आहेत, त्यासाठी किती खर्च केला आहे, याची स्पष्टता येणे आवश्यक आहे. म्हाळुंगे गावापासून ते पुढे नांदे, चांदेपर्यंत रस्त्याचे काम कोणी केले, याची माहिती महापालिकेला नाही. कोणीही या रस्त्याची जबाबदारी घेण्यासाठी समोर आले नाही
अशी आहे स्थिती
बालेवाडी स्टेडियम ते म्हाळुंगे गावापर्यंतचा रस्ता पूर्णपणे विकसित झाला आहे
म्हाळुंगे गावापासून पुढे सुमारे दोन किलोमीटरचा रस्ता अरुंद आहे. त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत
अतिक्रमणांमुळे रस्ता आणखी लहान झाला आहे
गावापासून गोदरेज ग्रीन व्हिस्टा सोसायटीपर्यंतच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी पॅचवर्क
सोसायटी ते व्हिजिटी सर्कल रस्ता मोठा आहे, पण रस्त्याची एक बाजू बंद
बंद असलेल्या रस्त्यावर प्रचंड चिखल व मैलापाणी
डंपर, सिमेंट मिक्सर ट्रक या अवजड वाहनांची संख्या मोठी