पुणे प्रतिनिधी : म्हाळुंगे गावातील नागरिकांच्या विविध प्रलंबित समस्यांबाबत आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.
म्हाळुंगे गावातील ऑर्चिड हॉटेल ते व्ही.टी.पी. बांधकाम प्रकल्पापर्यंतच्या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण, तसेच ड्रेनेज लाईन व पावसाळी पाण्याची लाईन टाकण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे कार्याध्यक्ष गणेश कळमकर, माजी सरपंच रेखाताई पाडळे, माजी सरपंच नामदेवराव गोलांडे, उद्योजक सोपानराव पाडळे व सुरेशराव पाडळे यांनी चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेऊन म्हाळुंगे गावातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांची माहिती दिली.
नागरिकांच्या मागणीची दखल घेत चंद्रकांतदादा पाटील यांनी पुणे महानगरपालिकेच्या महापौर सौ. मंजुषाताई नागपुरे व स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथजी भिमाले यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून आवश्यक बजेट उपलब्ध करून देत रस्ता, ड्रेनेज व पावसाळी लाईनची कामे तातडीने सुरू करण्याच्या सूचना दिल्या. तसेच संबंधित नागरिकांनी महापौर व स्थायी समिती अध्यक्षांची भेट घेऊन निवेदन देण्याच्या सूचनाही करण्यात आल्या.
त्यानुसार गणेश कळमकर यांच्या सोबत माजी सरपंच रेखाताई पाडळे, माजी सरपंच नामदेवराव गोलांडे, उद्योजक सोपानराव पाडळे, सुरेश पाडळे व सचिन पाडळे यांनी महापौर मंजुषाताई नागपुरे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.
यावेळी महापौरांनी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देत अतिरिक्त आयुक्त दिवटे, पथ विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. बनकर आणि ड्रेनेज विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. गोजारे यांना संबंधित कामांबाबत निर्देश दिले.
महापालिका प्रशासनाकडून सध्या रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्यात येतील. तसेच पावसाळा संपल्यानंतर मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार असून ड्रेनेज लाईन व पावसाळी पाण्याच्या लाईनचे कामही पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती नागरिकांना देण्यात आली.
म्हाळुंगे गावातील नागरिकांच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नांना आता गती मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.