आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

बचत गटांना मिनी ट्रॅक्टरसाठी ९० टक्के अनुदान; समाज कल्याण विभागाची अशी कोणती योजना?

शरद लाटे  486   05-08-2026 07:12:57

Pune 

ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना आधुनिक शेतीसाठी आवश्यक यांत्रिकीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत समाज कल्याण विभागामार्फत मिनी ट्रॅक्टर व त्याच्या उपसाधनांच्या खरेदीसाठी ९० टक्के अनुदानाची योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेमुळे अल्प आर्थिक सहभागातून बचत गटांना आधुनिक कृषी यंत्रसामग्री उपलब्ध होणार असून शेतीची उत्पादकता वाढण्याबरोबरच त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणालाही चालना मिळणार आहे.

ग्रामीण भागातील अनेक बचत गटांकडे शेतीसाठी आवश्यक यांत्रिक साधनांची कमतरता असल्याने उत्पादन खर्च वाढतो आणि शेतीची कामे वेळेत पूर्ण करणे कठीण जाते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने ही योजना सुरू केली आहे. मिनी ट्रॅक्टर आणि त्याच्या उपसाधनांच्या साहाय्याने मशागत, पेरणी, आंतरमशागत तसेच इतर शेतीची कामे अधिक वेगाने, कमी खर्चात आणि कार्यक्षमतेने करता येणार आहेत. त्यामुळे शेतीतील उत्पादकता वाढण्यासही मदत होणार आहे.

कोणते बचत गट ठरणार पात्र?

योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित स्वयंसहाय्यता बचत गटातील किमान ८० टक्के सदस्य अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध घटकातील असणे आवश्यक आहे. बचत गटाचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असावे. तसेच गटाची नोंदणी गट विकास अधिकारी, कृषी अधिकारी किंवा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकांकडे झालेली असणे बंधनकारक आहे. शासनाने निश्चित केलेल्या सर्व अटी पूर्ण करणारे नोंदणीकृत बचत गट या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.

अनुदानाची रक्कम किती?

योजनेअंतर्गत मिनी ट्रॅक्टर आणि त्याच्या उपसाधनांच्या खरेदीसाठी कमाल ३ लाख ५० हजार रुपयांपर्यंतचा खर्च ग्राह्य धरला जाणार आहे. यामध्ये लाभार्थी बचत गटाने केवळ १० टक्के म्हणजे ३५ हजार रुपयांचा स्वतःचा हिस्सा भरायचा असून उर्वरित ९० टक्के म्हणजे कमाल ३ लाख १५ हजार रुपयांचे अनुदान शासनाकडून संबंधित बचत गटाच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे कमी आर्थिक गुंतवणुकीत आधुनिक कृषी यंत्रसामग्री उपलब्ध होणार आहे.

आर्थिक सक्षमीकरणाला चालना

या योजनेमुळे बचत गटांना स्वतःच्या शेतीसाठी मिनी ट्रॅक्टरचा वापर करता येणार असून आवश्यकतेनुसार इतर शेतकऱ्यांनाही ट्रॅक्टर सेवा उपलब्ध करून अतिरिक्त उत्पन्न मिळविण्याची संधी निर्माण होऊ शकते. त्यामुळे ग्रामीण भागातील बचत गटांचे आर्थिक सक्षमीकरण आणि स्वावलंबन वाढण्यास मदत होणार आहे. योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र स्वयंसहाय्यता बचत गटांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, जळगाव येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा किंवा ०२५७-२२६३३२९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी केले आहे.

 


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.