आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

पुसदच्या नाईक घराण्याला मंत्रिमंडळात संधी; मुंडे परिवार मात्र कमनशिबवान

Swati Jain   409   03-08-2026 12:00:40

Pune 

दिवंगत वसंतराव नाईक हे सलग सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहिलेले राज्यातील एकमेव नेते होते. त्यांच्यानंतर सुधाकरराव नाईक यांनाही मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची संधी मिळाली.

पुढे त्याच घराण्यातील मनोहरराव नाईक मंत्रीमंडळात होते आणि आता इंद्रनील नाईकही विद्यमान मंत्री आहेत. या घराण्यावर जगदंबेची कृपाच असून, नाईक हे नशीबवान आहेत. मुंडे घराण्यात मात्र तसे नसून आम्हा भावंडांपैकी एकाला मंत्रीमंडळाच्या बाहेर राहावे लागत आहे, अशी खंत व्यक्त करून माजीमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) आमदार धनंजय मुंडे यांनी आपली खदखद पुन्हा एकदा जाहीररीत्या मांडली.

परळी तालुक्यातील सिरसाळा येथे वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मुंडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे, पुसदच्या नगराध्यक्षा मोहिनी नाईक यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना मुंडे यांनी आपल्या भगिनी पंकजा मुंडे या मंत्रिमंडळात आहेत, मात्र, आपण मंत्रिमंडळाच्या बाहेर असून, आम्ही दोघेही मंत्रिमंडळात चाललो नाहीत, अशी खंत व्यक्त केली. मुंडे घराण्यालाही अशाच आशीर्वादाची गरज असल्याचे ते म्हणाले. संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर धनंजय मुंडे यांना फडणीस अन्न व नागरी पुरवठा मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्याला दीड वर्षे लोटले असून, मंत्रीपद गेल्याचे शल्य धनंजय मुंडे वारंवार जाहीरपणे बोलून दाखवत असल्याचे यापूर्वीही दिसून आले आहे. अलिकडे परळीत महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांच्या विभागाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय पशुप्रदर्शनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना "आमच्या इच्छा पूर्ण करणारी कामधेनू आता तुम्हीच आहात" असे विधान केले होते. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातही, राजकारणात खेळ असो अथवा खेळात राजकारण असो, क्रिकेटचा विश्वचषक जिंकून दिलेल्या संघातील सूर्यकुमार यादवला देखील संघाने बाहेर ठेवले होत" असा संदर्भ देत धनंजय मुंडे यांनी अप्रत्यक्षपणे आपल्याला मंत्रिपदापासून दूर ठेवल्याविषयीची खंत व्यक्त करून दाखवली होती.

परळीतील दुसऱ्या एका कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी आपल्याला भविष्यात मोठी संधी मिळू शकते, असे विधान केले असून, त्याचीही चर्चा सुरू झाली आहे. मागच्या काही काळात सर्वच क्षेत्रातील आपले वजन कमी झाले होते. परंतु येणारा काळ हा आपला आहे आणि त्या काळात आपल्याला तंदुरुस्त राहणे गरजेचे आहे म्हणून मी नियमित व्यायाम करतोय, असे सांगत आमदार मुंडे यांनी सूचक विधानही केले.

नुकत्याच जिल्हा दौऱ्यावर आलेल्या बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासोबत धनंजय मुंडेच प्रत्येक कार्यक्रमात सोबत होते. त्याच्या आधारेच मुंडेंनी राजकारणात पुन्हा आपले वजन वाढले आहे, हे विधान केले आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

 


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.