आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

निवडणुकांना अखेर मुहूर्त? ग्रामपंचायत, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत मोठी बातमी

नितीन देशपांडे   383   31-07-2026 15:22:12

Pune 

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांनंतर आता पुन्हा एकदा राज्यात निवडणुकांचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.

मात्र, या निवडणुका घेण्यासाठी नागरिकांना अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर रखडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांना आता लवकरच मुहूर्त लागण्याची शक्यता आहे. यासोबतच राज्यातील हजारो ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही होणार असल्याने ग्रामीण भागात पुन्हा राजकीय हालचालींना वेग येणार आहे.

सध्या राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पडताळणी मोहिमेचे (SIR) काम सुरू आहे. निवडणूक आयोगाकडून ही प्रक्रिया वेगाने राबवली जात असून, मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. याशिवाय ओबीसी आरक्षणासंदर्भातील न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

ओबीसी आरक्षणामुळे काही भागांमध्ये आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा जास्त झाली होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने कायदेशीर नियमांचे पालन करूनच निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते. न्यायालयाने ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीपर्यंत निवडणुका घेण्याबाबत शक्यता तपासण्यास सांगितले होते.

दरम्यान, भारतीय निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार अंतिम मतदार यादी 19 ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे. त्यामुळे सध्या निवडणूक अधिकारी आणि बीएलओ मतदार यादीच्या कामात व्यस्त आहेत. मतदार याद्या पूर्णपणे तयार झाल्यानंतरच निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील 12 हजारांहून अधिक ग्रामपंचायती, रखडलेल्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि मुदत संपणाऱ्या 105 नगरपंचायतींच्या निवडणुका वर्षअखेरीस किंवा जानेवारी 2027 मध्ये होण्याची शक्यता आहे.

या सर्व निवडणुका एकाच कालावधीत घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून तयारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत ग्रामीण आणि स्थानिक राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.