Pune News
पुणे महापालिकेने (PMC) शहरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा पाऊल उचलले आहे. शहरातील प्रदीर्घ काळापासून रखडलेल्या 12 महत्त्वाच्या 'मिसिंग लिंक' (अपूर्ण रस्ते जोडणी) रस्त्यांची कामे पुढील एका वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने जाहीर केले आहे.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी या कामांना गती देण्याचे आदेश दिले असून, यामुळे पुणेकरांची वाहतूक कोंडीतून मोठी सुटका होणार आहे.
सर्वेक्षणातून समोर आलेली भीषण वास्तवता
हा प्रकल्प अचानक सुरू झालेला नसून, ऑगस्ट 2022 मध्ये एका खाजगी सल्लागार संस्थेने पुणे शहर आणि नव्याने समाविष्ट झालेल्या गावांचे सविस्तर सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणात धक्कादायक बाब समोर आली की, पुणे शहराच्या विकास आराखड्यात आणि प्रादेशिक योजनेत समाविष्ट असलेले सुमारे 678 ते 700 रस्ते वेगवेगळ्या ठिकाणी अपूर्ण आहेत. या सर्व अपूर्ण रस्त्यांची एकूण लांबी 459 ते 520 किलोमीटर एवढी प्रचंड आहे. या तुटलेल्या रस्ते नेटवर्कमुळे वाहनचालकांना इच्छा नसतानाही लांबच्या आणि प्रचंड गर्दीच्या मार्गाने प्रवास करावा लागत आहे. Pune News
33 उच्च-प्राधान्य मार्ग
सर्वेक्षणानंतर महापालिकेने पहिल्या टप्प्यात वाहतुकीवर थेट आणि मोठा प्रभाव टाकणारे 33 रस्ते ‘उच्च-प्राधान्य’ म्हणून निवडले होते. हे 33 रस्ते एकूण 12 किलोमीटर लांबीचे आहेत, मात्र ते पूर्ण झाल्यास तब्बल 60 किलोमीटरचे सलग रस्ते नेटवर्क नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे. परंतु, गेल्या दीड वर्षांत प्रशासकीय उदासीनतेमुळे या 33 पैकी केवळ 5 रस्ते पूर्ण होऊ शकले आणि उर्वरित कामे कागदावरच राहिली. यामुळे होत असलेल्या टीकेची दखल घेत आता उर्वरित रस्त्यांपैकी 12 संवेदनशील मार्गांवर तातडीने काम सुरू करण्यात आले आहे.
पुणेकरांना काय फायदा होणार?
भूसंपादनाच्या अडचणींवर वाटाघाटींद्वारे मार्ग काढत हे प्रलंबित 12 रस्ते एका वर्षात पूर्ण करण्याचा प्रशासनाचा ठाम निर्धार आहे. हे मिसिंग लिंक्स जोडल्यामुळे शहरातील निवासी आणि व्यावसायिक क्षेत्रांना थेट कनेक्टिव्हिटी मिळेल. परिणामी, मुख्य चौकांमधील वाहनांचा भार हलका होईल, इंधनाची बचत होईल आणि सध्या सुरू असलेल्या इतर मोठ्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना या रस्त्यांची मोलाची जोड मिळून पुणेकरांचा प्रवास अधिक सुस्साट होईल.