महादेव अण्णा कोंढरे उपसभापती करंजावणे, आकाश आंग्रे, तुषार मांजिरे यांच्या मागणीला यश
भुकूम, ता. मुळशी : मुळशी तालुक्यातील भुकूम–मानस लेक परिसरातील अनेक गावांसाठी अडचण ठरत असणाऱ्या व पुण्यात कामानिमित्त ये जा करण्यासाठी अनेक दिवसापासून बसची मागणी होत होती, यासंदर्भात बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा मुळशी तालुकाध्यक्ष महादेव अण्णा कोंढरे, मुळशी पंचायत समितीचे उपसभापती दगडूकाका करंजावणे, आकाश आंग्रे आणि तुषार मांजिरे यांच्या माध्यमातून बस सेवेसाठी मागणी होत होती याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांच्या विशेष प्रयत्नांतून भुकूम–मानस लेक परिसरासाठी पीएमपीएमएल बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. या बससेवेमुळे परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांची प्रलंबित मागणी अखेर पूर्ण झाली आहे.
ही बससेवा सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष महादेव अण्णा कोंढरे, मुळशी पंचायत समितीचे उपसभापती दगडूकाका करंजावणे, आकाश आंग्रे आणि तुषार मांजिरे यांनी खासदार सुप्रिया सुळे तसेच पीएमपीएमएल प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने भुकूम–मानस लेक परिसराला सार्वजनिक वाहतुकीची महत्त्वपूर्ण सुविधा उपलब्ध झाली आहे.
बससेवेच्या शुभारंभप्रसंगी बसचे हार घालून व नारळ फोडून पूजन करण्यात आले. तसेच पीएमपीएमएलच्या चालक व वाहकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांनी बससेवेच्या प्रारंभाबद्दल आनंद व्यक्त केला.
नवीन बससेवा सुरू झाल्यामुळे भुकूम–मानस लेक परिसरातील नागरिक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच नोकरदार वर्गाला पुणे शहराशी अधिक सुलभ, सुरक्षित व किफायतशीर सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध होणार असून दैनंदिन प्रवास अधिक सोयीचा होणार आहे.