Pune
गेल्या काही वर्षांत शहराची झालेली हद्दवाढ आणि रस्त्यांची वाढलेली संख्या यामुळे स्वच्छता करताना अनेक अडचणी येत आहेत. शहरातील अनेक भागांत योग्य पद्धतीने स्वच्छता ठेवली जात नसल्याने प्रायोगिक तत्त्वावर कंत्राटी पद्धतीने भरती करून शहर स्वच्छ ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
स्वच्छ पुणे, सुंदर पुणे' ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी महापालिकेने शहरातील रस्ते तसेच मोकळ्या जागांची स्वच्छता ठेवण्यासाठी कंत्राटी पद्धतीने ४ हजार ८१४ कर्मचारी घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर तीन महिन्यांसाठी हा प्रयोग केला जाणार असून, यासाठी प्रत्येक महिन्याला १३ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांसाठी ही भरती केली जाणार असून, यासाठी प्रत्येक महिन्याला १३ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली,' अशी माहिती समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.
या प्रयोगाच्या माध्यमातून प्रथमच शहरातील रस्ते आणि परिसर स्वच्छ ठेवण्याची सर्व जबाबदारी संबंधित ठेकेदारावर देण्यात येणार आहे. रस्ते झाडले गेले नाही, तर त्यासाठी संबंधित ठेकेदाराला जबाबदार धरण्यात येणार असून, त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. तसेच, प्रसंगी संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत देखील टाकले जाणार असल्याचे भिमाले यांनी सांगितले.
सद्यस्थितीत शहरात रस्ते स्वच्छतेसाठी सुमारे १० हजार कर्मचारी तसेच सफाई यंत्रे वापरली जात आहेत. यानंतरही शहरातील रस्त्यांवर अस्वच्छता दिसून येत असल्याने प्रशासनाने झाडणहद्दीचा फेरआढावा घेतला. महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमुळे रस्ते आणि झाडणकाम हद्द वाढली आहे. यासाठी सध्या कार्यरत असलेले मनुष्यबळ कमी पडत आहे.
कंत्राटी पद्धतीने झाडणकाम करण्यासाठी ठेकेदार आतापर्यंत केवळ मनुष्यबळाचा पुरवठा करत होते. या मनुष्यबळाकडून कामे करून घेण्याची जबाबदारी ही महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकांची होती. यामध्ये मंजूर मनुष्यबळापेक्षा कमी कर्मचाऱ्यांचा पुरवठा, कामे न करताच पगार दिल्याचे काही प्रकार समोर आले आहे.
घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संतोष वारुळे म्हणाले, पुणे शहरात ९ हजार २९८ झाडणहद्दी आहेत. या प्रयोगामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याला किमान ७०० मीटर रस्ता झाडण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. रस्ते अस्वच्छतेच्या तक्रारी आल्यास ठेकेदारच जबाबदार राहणार आहे.
प्रस्तावाला काँग्रेसचा विरोध
शहर स्वच्छतेसाठी स्वच्छतेचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदारांनाच मनुष्यबळ वाढवून देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजूर केला याला काँग्रेसचा विरोध असल्याचे गटनेते चंदू कदम यांनी सांगितले. स्थायी समितीने मान्य केलेल्या प्रस्तावामुळे महापालिकेचे वेतन घेणाऱ्या आरोग्य व विभागीय निरीक्षकांची जबाबदारी संपणार आहे.
सर्वत्र ठेकेदारांचाच वरचष्मा राहाणार आहे. हा विषय सर्वसाधारण सभेसमोर येणे आवश्यक आहे. दरम्यान, काँग्रेसचे स्थायी समिती सदस्य प्रशांत जगताप म्हणाले, 'बैठकीत या विषयाला विरोध केला. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प तीन महिन्यांसाठीच केला जाणार आहे, असे महापालिका आयुक्तांनी आम्हाला सांगितले.'