एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना प्रचंड धक्का, बड्या नेत्याचा तडकाफडकी पक्ष प्रवेश
Pune News
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. आधी 6 खासदारांनी ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र केला, त्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey ) , आदित्य ठाकरे यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनीही ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात प्रवेश केला.
या दोन्ही धक्क्यांची तीव्रता कायम असतानाच आता एका महिला नेत्याने शिंदे सेनेत प्रवेश केला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांनी जय महाराष्ट्र करत मध्यरात्री शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाला हा मोठा फटका मानला जात आहे.
मध्यरात्री पुन्हा ऑपरेशन टायगर
मध्यरात्री सव्वाच्या सुमारासा शुभांगी पाटील यांचा शिंदे गटात प्रवेश झाला. शेकडो कार्यकर्त्यांसह त्या मुंबईत आल्या आणि त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास खासदार श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. ऑपरेशन टायगर अंतर्गत 6 खासदार आणि सचिन अहिर यांना आपल्या पक्षात घेतल्यावर, शिवसेना ठाकरे गटाच्या आणखी एक नेत्या, शिंदेसेनेत आल्या. शिंदे यांच्या शिवसेनेकडून शुभांगी पाटील यांची शिवसेना उपनेते पदी निवड झाल्याचीही माहिती समोर आली आहे. ठाकरे गटातील आऊटगोईंग कायम असून पक्षाला पुन्हा मोठं भगदाड पडलं आहे.
मी सामान्य कार्यकर्ता, म्हणून मला उमेदवारी दिली नाही – पाटील यांचे आरोप
मध्यरात्री झालेल्या पक्षप्रवेशानंतर शुभांगी पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. मी १५ वर्ष, १०० ते १५० आंदोलन केले, ३५ हजार शिक्षक घेऊन अपक्ष लढले. उद्धव साहेबांना बोलले होते, मला शिक्षक पदवीधर म्हणून उमेदवारी मिळावी पण वेगळंच घडलं. मी सामान्य कार्यकर्ता आहे म्हणून मला उमेदवारी दिली नाही, असा आरोप शुभांगी पाटील यांनी यावेळी केला.
एकदा आम्हाला तुमची वेळ द्या, २० हजारचा मागच्या वेळी मेळावा घेतला होता . २० ते ३० हजार शिक्षक दिसतील तुम्हाला, तुम्ही व्यवस्था केली त्याबद्दल आभार , अधिकमास गेला पण तो आज आहे असे मला जाणवलं असं पाटील म्हणाल्या. सर्व निवडणूक जिंकून येऊ हा शब्द देते, सर्वांच्या वतीने लाडक्या भावाला एकनाथ शिंदे याना उदंड आयुष लाभो , जी संधी तुम्ही द्याल ती आम्ही प्रामाणिक पणे पार पडू , काही चुकले असेल तर दिलगिरी व्यक्त करत असंही त्यांनी नमूद केलं.