आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

पिंपरी-चिंचवड भाजपात आता ‘शिस्त पर्व’; कामगिरी दाखवा, अन्यथा पद सोडा!

नितीन देशपांडे   211   01-07-2026 19:34:52

पिंपरी-चिंचवड -: भारतीय जनता पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहर संघटनेत आता पक्षशिस्तीला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून, पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता थेट ‘ॲक्शन’ घेतली जाणार आहे. 

शहरातील वाढत्या अंतर्गत मतभेद आणि सार्वजनिक वक्तव्यांची गंभीर दखल घेत, शहर कोअर कमिटीने “कामगिरी दिसेल तरच पदलाभ, अन्यथा कोणालाही सूट नाही,” असा सज्जड इशारा दिला आहे.

शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत आगामी महानगरपालिका निवडणुका आणि संघटनात्मक बांधणीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार अश्विनी जगताप, संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, माजी जिल्हाध्यक्ष सदाशिव खाडे आणि सत्तारुढ पक्षनेते प्रशांत शितोळे उपस्थित होते.

बैठकीत स्पष्ट करण्यात आले की, पक्षाची अधिकृत भूमिका हीच अंतिम मानली जाईल. यापुढे संघटनेच्या व्यासपीठावर चर्चा न करता सार्वजनिकरित्या मत मांडणे किंवा माध्यमांतून दबावतंत्र वापरणे हा शिस्तभंग मानला जाईल आणि अशा संबंधितांवर कठोर संघटनात्मक कारवाई केली जाईल. तसेच, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या कामाचा स्वतंत्र आढावा घेण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. बूथ स्तरावरील काम, सदस्य नोंदणी, जनसंपर्क आणि सामाजिक उपक्रमांच्या आधारे पदाधिकाऱ्यांचे मूल्यमापन होणार असून, केवळ पद धारण करणाऱ्यांना नव्हे, तर प्रत्यक्ष कामगिरी करणाऱ्यांनाच भविष्यात संघटनेत संधी दिली जाणार आहे. महापालिकेतील स्वीकृत सदस्य नियुक्तीचे अधिकारही आता स्थानिक पातळीवर कठोर निकषांच्या चौकटीत राहून वापरले जातील, असेही या बैठकीत नमूद करण्यात आले आहे.

"भारतीय जनता पक्ष ही शिस्त, संघटन आणि कार्यकर्त्यांच्या कष्टावर उभी असलेली विचारसरणी आहे. पक्षात वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा संघटनेचे हित सर्वोच्च आहे. पक्षापेक्षा कोणीही मोठा नाही. संघटनेने दिलेली जबाबदारी जे कार्यकर्ते प्रामाणिकपणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडतील, त्यांनाच भविष्यात संधी मिळेल. पक्षविरोधी भूमिका किंवा शिस्तभंग कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही."

— शत्रुघ्न (बापू) काटे, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.