पुणे
महाराष्ट्राला आषाढी वारीचे वेध लागले असताना यंदाच्या वारी काळामध्ये तुकाराम मुंडे यांच्या अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई मोहीम राबवली जाणार असल्याचे संकेत राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहेत.
आषाढी वारीच्या निमित्ताने ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज पंढरपूर येथे आज बैठक घेतली. या बैठकीमध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कारवाया करून लोकांना स्वच्छ आणि चांगले अन्न मिळत याची दक्षता घेतली जाणार असल्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.
वारकऱ्यांना दर्जेदार अन्न मिळण्यासाठी FDA ॲक्शन मोडवर
त्यासाठी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे तुकाराम मुंडे यांच्याशी देखील संपर्क साधणार आहेत. त्याचबरोबर यंदाच्या आषाढी वारीत संपूर्ण पालखी मार्गावर ग्रामपंचायतच्या हद्दीत दहा हजार झाडे जिल्हा परिषदेकडून लावली जाणार आहेत. त्यामुळे यंदाच्या वर्षी हरित वारी करण्याचा संकल्प होत असल्याचे गोरे म्हणाले.
आषाढी वारीदरम्यान वारकऱ्यांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली विशेष धडक मोहीम राबवली जाणार आहे. भेसळयुक्त खाद्यपदार्थ, निकृष्ट पेढे आणि अस्वच्छ हॉटेल चालवणाऱ्यांवर एफडीएकडून कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. पालखी मार्गावरील हॉटेल्स, दुकाने आणि अन्न विक्रेत्यांवर एफडीएकडून अचानक धाडी टाकल्या जाणार आहेत.
महाराष्ट्र परिवहन विभागाच्या पाच हजार बसेस वारीकरीता
आषाढी वारीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात. याच भाविकांना प्रवासाची चांगली सोय व्हावी यासाठी महाराष्ट्र परिवहन विभागाच्या पाच हजार बसेस वारीकरीता सोडल्या जाणार असल्याची माहितीही जयकुमार गोरे यांनी दिली.
तुकाराम मुंढे यांच्याकडून कारवाईचा धडाका
अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून (मे २०२६) राज्यात भेसळखोर, गुटखा माफिया आणि बनावट औषध विक्रेत्यांविरोधात कारवायांचा धडाका लावला आहे. अनेक ठिकाणी धाडी टाकून कोट्यवधींचा साठा जप्त करणे, दोषींना जणांना अटक करणे यांसारख्या अत्यंत कठोर व प्रभावी मोहिमांमुळे भ्रष्ट माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.