Pune
जिल्ह्यातील केज तालुक्यात विलास घुले हत्या प्रकरणात कारवाईचा वेग मंदावल्याचा आरोप करत माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांनी पोलिस यंत्रणेबाबत गंभीर संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणात एका आरोपीला अटक न झाल्याचा मुद्दा उचलून धरत एका आरोपीला अटक होत नाही, पोलिसांचा हा लाडका आहे का?
असा थेट सवाल उपस्थित करत धनंजय मुंडेंनी खासदार बजरंज सोनवणे यांना डिवचले आहे. . एकाला एक न्याय, एकाला एक न्याय… आमचा कोणाशी वैयक्तिक वाद नाही, पण आम्ही ताकदीने आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला. विलास घुले हत्या प्रकरणात पुरवणी जबाबात खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरभ सोनवणे याचे नाव आहे.
धनंजय मुंडे यांनी आज टाकळी गावात जाऊन हत्या प्रकरणातील पीडित विलास घुले यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी कुटुंबाचे सांत्वन केले तसेच या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले. धनंजय मुंडे यांनी मृत विलास घुलेच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी विलास घुले यांचा भाऊ रमेश घुले यांना अश्रू अनावर झाले.
पोलिस जाणीवपूर्वक अटक टाळत आहेत का? मुंडेंचा सवाल
उमेश माने याला मारण्यासाठी काही जणांनी ठरवून हल्ला केला. विलास घुले हे हॉटेलचे मालक म्हणून भांडण सोडवण्यासाठी गेले असता त्यांच्यावरच हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणात 9 आरोपींना अटक केली असली तरी एक आरोपी फरार आहे किंवा त्याला अटक केली जात नाही तो आरोपी मोठ्याचं लेकरू आहे म्हणून पोलिस त्याला अटक करत नाहीत का? पोलिसांवर आमचा संशय आहे. एका आरोपीला वाचवण्यासाठी पोलिस जाणीवपूर्वक अटक टाळत आहेत का? असा प्रश्न मुंडे यांनी उपस्थित केला. एकाला एक न्याय, एकाला एक न्याय… आमचा कोणाशी वैयक्तिक वाद नाही, पण आम्ही ताकदीने आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला.
धनंजय मुंडे काय म्हणाले?
धनंजय मुंडे म्हणाले, तो आरोपी कुठल्याही जातीचा असो, त्याच्याशी आमचं काही देणंघेणं नाही. जेजे कोणी गुंतले असतील त्यांना शासन झालं पाहिजे. तपास झाल्यानंतर एखादा सुटला तर आमचं काही म्हणणं नाही, पण तपास निष्पक्ष असला पाहिजे. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप आणि दबाव असल्याची आहे. पोलीस यंत्रणेवर कोणाचा दबाव आहे, हे तुम्हालाही माहिती आहे. जिल्हा स्वच्छ होणार होता ना, मग 22 खून कसे झाले? एका प्रकरणात 200 दिवस एका ठिकाणी बसून होता, या प्रकरणातही मीडिया तोच न्याय देणार का? काही झालं की एका जातीला गुन्हेगार ठरवून टाकायचं, ही पद्धत चुकीची आहे.
रमेशला संरक्षण देण्याची मागणी करणार: धनंजय मुंडे
ST समाजातील उमेश माने यांना धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप करत मुंडे म्हणाले, ST समाजाचा उमेश माने आहे त्याला धमक्या दिल्या जात आहेत. आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि सरकारलाही स्वस्थ बसू देणार नाही. ही घटना काय राजकारणाची आहे का? कुणाला काय बंद पाडलंय? त्यांनी जे राजकारण केलं, एका व्यक्तीला उद्ध्वस्त करायचं होतं. आता ते स्वतःलाच वाघ म्हणायला लागलेत… काय म्हणणार? या कुटुंबाचीही भेट घेण्यासाठी यावं, अशी आमची अपेक्षा आहे. पुढील काळात हा मुद्दा विधिमंडळात उपस्थित करण्याचा मी पुन्हा सदनामध्ये हा प्रश्न घेणार आहे. रमेशला संरक्षण देण्याची मी मागणी करणार आहे.