बहुलीतील तरुणांचा पुढाकार; श्रमदानातून सोडवला पाणीपुरवठ्याचा प्रश्न
श्रमदानातून पाणीटंचाईवर उपाय; बहुलीतील युवकांचा आदर्श उपक्रम
पुणे प्रतिनिधी -: खडकवासला विधानसभा मतदारसंघातील बहुली गावातील गायकवाडवाडी येथे नदीतील पाणी कमी झाल्यामुळे गावाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता यामुळे नागरिकांना नियमित व स्वच्छ पाणी मिळत नसल्याने पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली होती.
या समस्येवर उपाय म्हणून गावातील युवकांनी पुढाकार घेत श्रमदानातून गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीची स्वच्छता केली. विहिरीतील गाळ तसेच साचलेला पाला-पाचोळा काढून विहीर स्वच्छ करण्यात आली. त्यामुळे गायकवाडवाडीतील पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यास मदत झाली आहे.
या श्रमदान मोहिमेत तुषार रामदास गायकवाड, तुषार मुरलीधर गायकवाड, धर्मा मानकर, केतन शिंदे, आकाश गायकवाड, किरण साळुंके आणि बाळा पाटणकर यांनी सक्रिय सहभाग घेतला.
या उपक्रमाबद्दल हवेली पंचायत पंचायत समितीचे माजी सदस्य नितीनदादा वाघ आणि रामदास गायकवाड यांनी सर्व युवकांचे अभिनंदन केले. नागरिकांची समस्या दूर करण्यासाठी युवकांनी दाखविलेल्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत त्यांनी सर्वांचे आभार मानले.
स्थानिक युवकांनी एकजुटीने केलेल्या या श्रमदानातून पाणीटंचाईच्या समस्येवर प्रभावी उपाय शोधला असून, लोकसहभागातून गावाच्या विकासासाठी काम करण्याचा आदर्श निर्माण केला आहे.