आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

Rupali Chakankar: अजितदादा गेल्यानंतरचा पहिला वर्धपानदिन, रुपाली चाकणकरांची दांडी;

Swati Jain   164   11-06-2026 17:24:20

Pune News 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (अजित पवार) 27 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला पक्षाच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

अशोक खरात प्रकरणानंतर रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रुपाली चाकणकर एकाही सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित राहिल्या नाहीत.

अशोक खरात प्रकरणावरून रूपाली चाकणकर चांगल्याच अडचणीत आल्या आहेत. मात्र, या प्रकरणावर त्यांनी आधीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सदर प्रकरणाशी किंवा त्यातील कोणत्याही आर्थिक व्यवहाराशी आणि गैरकृत्याशी आपला दुरान्वयेही संबंध नाही. या प्रकरणाचा तपास पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने व्हावा, यासाठीच आपण आपल्या पदांचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र त्यानंतर दोन महिने रुपाली चाकणकर कुठेही दिसल्या नाहीत. वर्धापनदिनाच्या दोन दिवस अगोदर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आपली बाजू मांडली होती.

पक्षांतर्गत देखील नाराजी


अशोक खरात प्रकरणाणंतर रूपाली चाकणकर यांच्याविरोधात पक्षांतर्गत देखील नाराजी पाहायला मिळाली होती. त्यांच्याच पक्षातील काही नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी चाकणकर यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक भूमिका घेतली होती. चाकणकर यांना तातडीने पदावरून हटवण्यात यावे, अशा मागणीचे एक पत्र काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी थेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पाठवले होते. त्यामुळे देखील रुपाली चाकणकर नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत आहेत.

चाकणकरांनी कार्यक्रमाला दांडी का मारली?

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर आणि वर्धापन दिनाच्या अनुपस्थितीवर रूपाली चाकणकर यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो झालेला नाही. अजित पवारांच्या निधनानंतर होणाऱ्या पहिल्याच वर्धापनदिनाला माजी महिला प्रदेशाध्यक्षांची अनुपस्थिती खटकणारी होती. चाकणकरांच्या अनुपस्थितीमागे पक्षातील अंतर्गत धुसफस आहे की आणखी काय हे लवकरच समोर येईल. आगामी काळात या प्रकरणाला कोणते नवे वळण मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.