Pune news
भोसरी विधानसभा मतदारसंघातील ‘क’ व ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत चिखली, कुदळवाडी आणि पवारवस्ती परिसरातील मशिदी, मंदिरांसह ११ अनधिकृत बांधकामांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने मंगळवारी मध्यरात्री कारवाई केली.
कारवाई दरम्यान स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक केली. यामध्ये दोन पोलीस जखमी झाले असून सहा जणांना किरकोळ मार लागला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने फेब्रुवारी २०२५ मध्ये कुदळवाडीत मोठी कारवाई केली होती. ८५० एकरवर असलेल्या अनधिकृत गाेदामे, पत्राशेड, भंगार दुकानांवर हातोडा चालविला होता. सलग १५ दिवस ही कारवाई सुरू होती. त्यानंतर मे २०२५ मध्ये चिखली, रिव्हर रेसिडन्सी येथील इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेतील सात हजार २४५ चौरस मीटर भूभागावरील ६३ हजार ९७० चौरस फूट क्षेत्रफळ असलेले ३६ अनधिकृत बंगले, घरे महापालिकेने एकाच दिवसात जमीनदाेस्त केली होती. मागील महिन्यात ११ मे रोजी महापालिका प्रशासनाने कुदळवाडीतील अनधिकृत असलेल्या दोन मंदिरे आणि मशिदींवर कारवाई केली होती. त्यानंतर आता पुन्हा नऊ जून रोजी कुदळवाडी, चिखलीतील मध्यरात्री मशिदी, मंदिरासह ११ अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. मध्यरात्री महापालिकेचे पथक मोठा फौजफाटा घेऊन कुदळवाडीत दाखल झाले. एक ते तीन या वेळेत ही कारवाई करण्यात आली. यामध्ये २८००१ चौरस फूट क्षेत्रफळाची ११ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. कारवाईदरम्यान स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक केली. यामध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांना टाके घ्यावे लागले आहेत. सहा पोलिसांना किरकोळ मुकामार लागला आहे.
या मोहिमेत महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाचे १२ कार्यकारी अभियंता, ३२ उप अभियंता, १८ कनिष्ठ अभियंता आणि ४२ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बीट निरीक्षक) सहभागी झाले होते. तसेच वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी देखील सहभागी झाले होते. कारवाई दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी आणि जवळपास १५० एमएसएफ जवानांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तसेच २२ पोकलेन, २६ जेसीबी आणि १२० मजुरांच्या सहाय्याने ही बांधकामे हटवण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून घटनास्थळी ४ अग्निशमन वाहने आणि २ रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.
शहरातील अनधिकृत बांधकामांवर कोणतीही तडजोड न करता कठोर कारवाई करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. शहरातील नियोजित व शाश्वत विकासासाठी अनधिकृत बांधकामे पाडणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत बांधकामांना प्रशासनाकडून अभय दिले जाणार नाही. शहरातील पायाभूत सुविधा, सुरक्षितता आणि कायद्याचे पालन अबाधित राखण्यासाठी अशा कारवाया पुढेही सातत्याने राबविण्यात येतील. नागरिकांनीही बांधकाम करण्यापूर्वी सर्व आवश्यक परवानग्या घेऊनच पुढील कार्यवाही करावी, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले.
धार्मिकस्थळे अनधिकृतपणे महापालिकेच्या जागेवर उभारली होती. मंदिरे, मशिदींवर कारवाई केली आहे. अनधिकृत असलेल्या सर्वच धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यात येणार आहे. अनधिकृत बांधकामे पाडल्यानंतर प्रशासनाने तातडीने सीमाभिंत बांधून जागा ताब्यात घ्यावी, असे महापौर रवी लांडगे म्हणाले. पोलिसांच्या वाहनावर दगडफेक झाली आहे. यामध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांना टाके घ्यावे लागले आहेत. सहा पोलिसांना किरकोळ मुकामार लागला असल्याचे अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली यांनी सांगितले. प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची व दंगेखोरांना ताब्यात घेण्याची कार्यवाही चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले.