Pune
अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यामुळे त्यांना त्यांची राज्यसभेची जागा सोडावी लागली होती. या रिक्त जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ इच्छुक होते, अशी माहिती समोर आली होती.
तर भाजप नेत्या नवनीत राणा यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्यामुळे त्यांना संधी जाईल, अशीही चर्चा रंगली होती. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत विदर्भात नेत्याला राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना सुनील तटकरे म्हणाले की, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर आम्ही साधकबाधक चर्चा करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पर्यायाने महायुतीचे कारण एकाच जागेसाठी निवडणूक होत असल्याने राजेंद्र जैन यांना अधिकृत उमेदवार ठरवले आहे. विधान परिषदेमध्ये भंडारा स्थानिक स्वराज्य संस्थेमधून त्यांनी 12 वर्ष प्रतिनिधीत्व केलं. मध्यवर्ती बँक, फेडरेशन या सर्व संस्थांमध्ये राजेंद्र जैन यांनी दीर्घकाळ काम केलं आहे. विदर्भामध्ये सुद्धा पक्षाला संधी देण्याचं अनेक दिवसांपासून मनात होतं. त्यादृष्टीकोनातून पक्षाने एकमताने राजेंद्र जैन यांच्याबाबत निर्णय घेतलेला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
मागच्या काही दिवसांपासून छगन भुजबळ यांच्याबाबत चर्चा सुरू होती. भुजबळ राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक आहेत आणि राज्यात एक कॅबिनेट मंत्रिपददेखील मिळायला हवं, अशी देखील त्यांची मागणी असल्याचे समोर आले होते. या प्रश्नावर सुनील तटकरे म्हणाले की, आम्ही यासंदर्भात पक्षातंर्गत चर्चा केली. छगन भुजबळ हे पक्षाचे 1999 चे संस्थापक आणि राज्याचे अध्यक्ष आहेत. अजितदादांनी निर्णय घेतल्यानंतर त्या निर्णयप्रक्रियेत महत्त्वाचं योगदान जसं आमच्या सर्वांच आहे, तेवढंच योगदान छगन भुजबळ यांचं आहे. त्यामुळे त्यांचं ज्येष्ठत, त्यांचा अनुभव पक्षाला उद्याच्या दृष्टीकोनातून दिशादर्शक ठरणारा आहे. त्यामुळे त्यांच्या ज्येष्ठत्वाचा योग्य तो सन्मान होऊनचं पुढच्या कालावधीमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची वाटचाल करत असताना त्यासंदर्भातला निर्णय आम्ही एक मताने करणार आहोत, अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली.