आवाज जनमताचा.. राष्ट्रहिताचा!
 अहमदनगर

उमेदवारी मिळाली, पण एकच कागद ठरला डोकेदुखी; विक्रम काकडेंसमोर नवे संकट

शरद लाटे  216   02-06-2026 14:41:45

Pune 

हत्ती गेला अन् शेपूट राहिलं'... अगदी असंच काहीसं पुण्याच्या राजकारणात घडताना दिसतंय. पक्षातील निष्ठावंतांचा तीव्र विरोध पत्करून, जीवाचा आटापीटा करत विक्रम काकडेंनी विधानपरिषदेची उमेदवारी तर मिळवली; पण आता केवळ एका कागदाने म्हणजेच पुणे महापालिकेच्या थकीत मालमत्ता कराच्या मुद्द्याने त्यांची संपूर्ण उमेदवारीच धोक्यात आणली आहे.

शरद पवार गटाने याच एका कागदाचा आधार घेत काकडेंच्या अर्जावर आक्षेप घेतल्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर महायुतीची डोकेदुखी वाढली आहे.

विधानपरिषद निवडणुकीआधी महाराष्ट्राच्या राजकारणात एक अत्यंत धक्कादायक आणि नाट्यमय घडामोड घडली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यातून उमेदवारी दिलेले विक्रम काकडे अडचणीत येण्याची शक्यता आहे. विक्रम काकडे यांच्या उमेदवारी अर्जावर आता थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अधिकृत आक्षेप घेतला जाण्याची दाट शक्यता आहे. विक्रम काकडे यांनी पुणे महापालिकेचा मालमत्ता कर थकवला असल्याचा गंभीर मुद्दा शरद पवार गटाकडून उपस्थित केला जात आहे. जर हा आक्षेप कायदेशीररीत्या टिकला, तर काकडेंची उमेदवारी धोक्यात येऊ शकते.

निष्ठावंतांमध्ये तीव्र नाराजी
विक्रम काकडे हे भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांचे सुपुत्र आहेत. ते नुकतेच भाजपमधून राष्ट्रवादीत (अजित पवार गट) आले आणि त्यांना थेट विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली. यामुळे राष्ट्रवादीच्या अनेक वर्षांच्या निष्ठावंत नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पक्षाच्या नेत्या सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीतच कार्यकर्त्यांनी या उमेदवारीवरून आपली तीव्र नाराजी व्यक्त करत थेट विरोध दर्शवला.

सुनील टिंगरेंचा गेम?
अर्ज भरण्याच्या दिवशी झालेला प्रचंड विरोध आणि दबाव पाहता, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पक्षाने आमदार सुनील टिंगरे यांनाही अर्ज भरण्यास सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात हा केवळ निर्माण झालेला दबाव शांत करण्यासाठी खेळलेला एक राजकीय डाव होता, अशी चर्चा आता रंगली आहे. सुनील टिंगरे यांना केवळ 'सबस्टिट्यूट' (पर्यायी उमेदवार) म्हणून 'बी फॉर्म' देण्यात आला आणि ऐनवेळी त्यांचा गेम करत त्यांना 'कात्रजचा घाट' दाखवण्यात आला, अशी जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

पार्थ पवारांचे मित्र म्हणून उमेदवारी, विलास लांडेंचे गंभीर आरोप
या संपूर्ण वादात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विलास लांडे यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. विलास लांडे यांनी अत्यंत गंभीर आरोप करत म्हणाले, विक्रम काकडे यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी किंवा पक्षातील योगदान नसताना केवळ पार्थ पवारांचे मित्र आणि व्यावसायिक भागीदार म्हणून उमेदवारी देण्यात आली आहे.

या उमेदवारीच्या मागे मोठे आर्थिक हितसंबंध असल्याचा थेट आरोपही त्यांनी केला आहे. पक्षातील अंतर्गत बंडाळी, विलास लांडेंचे गंभीर आरोप आणि त्यातच आता शरद पवार गटाने मालमत्ता कराच्या मुद्द्यावरून घेतलेला आक्षेप, यामुळे विक्रम काकडे यांच्यासह अजित पवार गटाची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. आता यावर निवडणूक निर्णय अधिकारी काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विक्रम काकडे यांची प्रतिक्रिया

ज्या प्रॉपर्टी टॅक्स बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आली आहे ती प्रॉपर्टी ४ वर्षापूर्वी विक्रम काकडे यांच्याकडून विकण्यात आली आहे. सदर खरेदी विक्री खत हे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे जमा करण्यात आली आहे.


 आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.



 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती
 जाहिराती
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.